

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतराचा विषय चर्चिला जात आहे. याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. त्यात विधान सभेतही या विषयावर चर्चा झाली आहे. राज्य सरकार त्यादृष्टीने कार्यवाही करीत आहे. धनगर समाजाच्यावतीने 'अहिल्यादेवी होळकर नगर' नामांतर यात्राही काढण्यात आली आहे. याबाबत आपणही भूमिका जाहीर केली होती. सर्वानुमते निर्णयानुसार नगरचे नामांतर करण्यास आपला पाठिंबा राहणार आहे. परंतु, सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे मत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले.
धनगर समाज सेवा संघ अहमदनगरच्यावतीने राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अॅड. रामहरी रूपनर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक निखिल वारे, राजेंद्र तागड, प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, इंजि. रंगनाथ भोंडवे, दत्तात्रेय गावडे, निशांत दातीर, सचिन डफळ आदी उपस्थित होते.
खा.विखे पुढे म्हणाले, धनगर समाजाच्या उन्नत्ती आणि प्रगतीसाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजातील संघटनांनी प्रयत्न करावेत. संघटनेशिवाय कोणतही कृती प्रत्यक्षात येत नाही, त्यासाठी समाजाने संगठन मजबूत करून समाजाचा विकास साधावा, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिष्ठानच्या सभामंडप व इतर विकास कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी आमदार रामहरी रुपनर, राजेंद्र तागड यांनी मनोगत व्यक्त केले.