नगर : काम मंजूर एकीकडे, झाले दुसरीकडे..! मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामामध्ये सावळा गोंधळ | पुढारी

नगर : काम मंजूर एकीकडे, झाले दुसरीकडे..! मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामामध्ये सावळा गोंधळ

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यात झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये अधिकार्‍यांनी चांगलाच सावळा गोंधळ केला आहे. कामाला मंजुरी एका बाजूने असताना प्रत्यक्षात काम दुसर्‍या बाजूने झाल्याने, वाद होऊन रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे यास जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. राज्याचे तत्कालीन जलसंधारण मंत्री व विद्यमान आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार खेड ते आगवणे वस्ती हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर केला होता. याचे भूमिपूजनही आमदार शिंदे यांच्या हस्ते त्यावेळी झाले होते. मात्र, आजअखेर हा रस्ता केवळ अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण झालेला नाही.

हे काम ज्या पद्धतीने मंजूर आहे, तसे न होता दुसर्‍या बाजूने सुरू करण्यात आले. वास्तविक पाहता ज्या बाजूने हे काम मंजूर आहे तसे करून घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या विभागातील संबंधित सर्व अधिकार्‍यांची होती. मात्र, काही स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार काम दुसर्‍या बाजूने सुरू करण्यात आले. यावेळी काही नागरिकांनी काम जसे मंजूर आहे त्याच पद्धतीने करावे, असा आग्रह देखील धरला होता. तसे पत्र देखील त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिले होते.

मात्र, असे असतानाही काम दुसर्‍या बाजूने सुरू झाले. रस्त्याचे खडीकरणही करण्यात आले. यानंतर दोन्ही गटांमध्ये वादावाद सुरू झाली. यामध्ये कोर्ट केसेस देखील झाल्या. निवेदन देण्यात आली. त्यातच कोरोना व इतर कारणांमुळे काम रखडले. ते अजूनही पूर्ण झालेले नाही. चुकीचे पद्धतीने झालेल्या कामाचे बिल देखील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी ठेकेदाराला अदा केले आहे. आता पुन्हा या रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित अधिकार्‍यांनी मंजूर असलेल्या अंदाजपत्रका प्रमाणे रस्ता करण्याची जबाबदारी असताना, ती व्यवस्थित पार पाडली नाही. यामुळे रस्ता चुकीच्या बाजूने झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे यास जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होणार का,असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.

संपूर्ण रस्ता व्हावा : हेमंत मोरे
हा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे व जसा मंजूर आहे तसा झालेला नाही. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांची आहे. आता हा संपूर्ण तीन किलोमीटरचा रस्ता शिंपोर्‍यापर्यंत पूर्ण करावा. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची सोय होईल, अशी मागणी माजी उपसभापती हेमंत मोरे यांनी केली आहे.

Back to top button