नगर : एमआयडीसीत फिरणार उद्योगांची चाके ! | पुढारी

नगर : एमआयडीसीत फिरणार उद्योगांची चाके !

जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी मंजूर करून आणल्यानंतर, येथे प्रत्यक्षात उद्योग सुरु करण्यासाठीही आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रमुख उद्योजकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान मतदारसंघात एमआयडीसी आणण्याचा शब्द रोहित पवार यांनी दिला होता. निवडून आल्यानंतर दीड वर्षांत दिलेल्या शब्दाची त्यांनी पूर्तता केली. महाविकास आघाडी सरकारने या मतदारसंघात एमआयडीसी मंजूर केली. आता हा विषय अंतिम टप्प्यात असून, तो तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार पवार यांनी विधानसभा अधिवेशनात दिले आहे. या एमआयडीसीत उद्योग आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याच्या मागणीलाही उद्योगमंत्र्यांनी सहमती दर्शविलेली आहे.

आमदार पवार यांनीही उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रविवारी त्यांनी टीपीसीलएल कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय संचालक साकेत कनोरिया, जिंदाल कंपनीचे मालक आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल, एशियन पेंटस् या कंपनीचे अमित चोक्सी यांची भेट घेऊन चर्चा केली. कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीत विविध कंपन्या सुरू व्हाव्यात, येथील विकासाला चालना मिळावी व या भागातील युवक-युवतींना रोजगार मिळावा, यासाठी आमदार पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही त्यांना सहकार्य मिळत आहे.

Back to top button