संगमनेरात जिल्हा काँग्रेसचे ‘हातसे हात जोडो’अभियान : आ. थोरात | पुढारी

संगमनेरात जिल्हा काँग्रेसचे ‘हातसे हात जोडो’अभियान : आ. थोरात

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  सर्वांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष हाच आपला विचार आहे. हाच विचार पुढे नेण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘हातसे हात जोडो’ अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान काँग्रेस कार्यकर्त्यांनी गावोगावी यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी थोरात साखर कारखाना अतिथी गृहावर अ.नगर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित ‘हातसे हात जोडो’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आ. थोरात बोलत होते.
अध्यक्षस्थानी आ. लहू कानडे तर व्यासपीठावर श्रीगोंदा कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे, दुर्गाताई तांबे, नगरचे काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे, डॉ. जयश्रीताई थोरात, उत्कर्षाताई रुपवते, हेमंत ओगले, प्रतापराव ओहोळ, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुजर, करण ससाणे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव म्हस्के, सचिन गुंजाळ, तालु काध्यक्ष मिलिंद कानवडे, संगमनेर शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, देशातील लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली. त्या यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी यशस्वी करून दाखविली. आगामी काळ महाविकास आघाडीचाच असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून शिव सेना तोडणे हे महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला सहन झाले नाही. त्यामुळे तो काळाने घेतलेला निर्णय हा लोकशाहीला घातक असल्याचे सांगत आ. थोरात म्हणाले, सध्या देशात जाती- धर्माच्या नावावर राजकारण सुरू आहे. हे राजकारण लोकशाहीस घातक आहे.

सध्या महागाई आणि बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारकडून इतर प्रश्न निर्माण केले जात असल्याचा आरोप करून, आ. थोरात म्हणाले, केंद्र व राज्य सरकार स्वायत्त संस्था हाताशी धरून कार्यकर्त्यांना भीती दाखवत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. प्रास्तविक ज्ञानदेव वाफारे व सचिन गुंजाळ, सूत्रसंचालन मिलिंद कानवडे यांनी तर शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले. यावेळी नागवडे कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे, सचिन गुजर, करण ससाणे, किरण काळे, उत्कर्षाताई रूपवते आदींची भाषणे झाली.

विषमता पेरण्याचे काम..!
काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. समता व बंधुताचा संदेश दिला. काँग्रेसने देशाला गुलामगिरीतून बाहेर काढले, मात्र सद्य स्थितीला देशातील काही लोक धार्मिक तेढ निर्माण करून विषमता पेरण्याचे काम करीत असल्याची टीका आ. लहू कानडे यांनी केली.

Back to top button