नगर : भिंगार कॅन्टोनमेंटचा बिगूल वाजला | पुढारी

नगर : भिंगार कॅन्टोनमेंटचा बिगूल वाजला

नगर : पुढारी वृत्तसेवा  : तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भिंगार छावणी परिषदेच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला आहे. संरक्षण मंत्रालयाने या निवडणुकीसाठी 30 एप्रिल ही तारीख जाहीर केली आहे. भिंगार छावणी परिषदेच्या 7 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. देशाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी निवडणुकीबाबत अधिसूचना जारी केली. भिंगार छावणी परिषदेची याआधीची निवडणूक जानेवारी 2015 साली झाली होती. लोकनियुक्त सदस्यांची मुदत जानेवारी 2020 मध्ये संपली. त्यानंतर छावणी परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.

लष्कराचे ब्रिगेडिअर छावणी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर लोकनियुक्त सदस्यांमधून उपाध्यक्षांची निवड केली जाते. लोकनियुक्त सदस्य नसल्याने मध्यंतरी अध्यक्ष आणि सीईओ हेच कारभार पाहत होते. ऑक्टोबर 2021 पासून शासनाने वसंत राठोड यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अध्यक्ष, सीईओ आणि नामनिर्देशित सदस्य अशा तिघा जणांकडून छावणी परिषदेचा कारभार सुरू होता. आता येत्या 30 एप्रिल रोजी छावणी परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

शिवसेना, ठाकरे गटाची पहिली परीक्षा
आतापर्यंत भिंगार छावणी परिषदेत भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व राहिलेले आहे. आता शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट तयार झाले होते. दोघांकडूनही आमचीच शिवसेना खरी असा दावा केला जात होता, परंतु आता निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केले आहे. या राजकीय बदलानंतर होणारी छावणी परिषदेची निवडणूक या दोन्ही गटांसाठी पहिलीच राजकीय परीक्षा ठरणार आहे.

निवडणूक जुन्या कायद्यानुसारच
छावणी परिषदेसाठी नवीन कायदा आणण्यात येत आहे. सध्या हे विधेयक संसदेसमोर ठेवण्यात आलेले आहे. त्यानुसार उपाध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. शिवाय उपाध्यक्षाला पूर्वीपेक्षा अधिक अधिकार असणार आहेत. त्यामुळे नवीन कायदा लागू झाल्यावरच छावणी परिषदेची निवडणूक होईल असे बोलले जात होते. आता जुन्या कायद्यानुसार ही निवडणूक होत आहे.

Back to top button