नगर : देवदर्शनावरून परतणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यूृ

नगर : देवदर्शनावरून परतणार्‍या युवकाचा अपघाती मृत्यूृ

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  देवदर्शनावरून मोटारसायकलवर घराकडे परतत असताना भरधाव वेगातील खासगी आराम बसने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नगर-मनमाड महामार्गावर देहरेच्या शिवारात शनिवारी (दि.18) सकाळी साठच्या सुमारास घडली. या अपघातात रवीद्र विलास लष्करे (वय 28, रा. देहरे, ता.नगर), असे त्याचे नाव आहे. रवींद्र हा नगर एमआयडीसीतील कंपनीत कामाला होता. आज शनिवारी (दि.18) देहर्‍यापासून जवळच असलेल्या शिंगवे गावात असलेल्या शनि मंदिरात सकाळी तो दर्शनासाठी गेला होता.

तेथून परतताना देहरेच्या शिवारात बडाख पेट्रोल पंपाजवळ नगरहून राहुरीच्या दिशेने भरधाव वेगात चाललेल्या खासगी आराम बसने त्याच्या मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक व गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्याचे चुलते राजेंद्र लष्करे यांनी रुग्णवाहिकेतून त्यास उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रवीद्रच्या पश्चात आई, वडील, पत्नी व तीन महिन्याचा मुलगा आहे. देहरेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news