नगर: कॉपीला मदत केल्यास शासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई : जिल्हाधिकारी सालीमठ

नगर: कॉपीला मदत केल्यास शासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई : जिल्हाधिकारी सालीमठ

नगर : पुढारी वृत्तसेवा : दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कालावधी दरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असून, कॉपीसाठी मदत केल्यास शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांवरही प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा शनिवारी (दि.17) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला. तसेच परीक्षा केंद्राबाहेर व्हिडिओ शूटिंग, सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवले जाणार असून, सहा भरारी पथके स्थापन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

दहावी व बारावी परीक्षेच्या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याची विशेष दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेतली जणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.18) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 31 मार्च होत आहे. त्यासाठी 108 परीक्षा केंद्र असून, 63 हजार 313 विद्यार्थी या परीक्षेला बसत आहे. तर इयत्ता 10 वी साठी दोन मार्चपासून या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी एकूण 179 परीक्षा केंद्र असून 69 हजार 534 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. असे दोन्ही मिळून जिल्ह्यात 287 केंद्र आहेत.

परीक्षा केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कॉपीमुक्त अभियानाबाबत वेळोवेळी बैठकीत घेण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक सुद्धा घेण्यात आली, असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस उपस्थित होते. जिल्ह्यात एकूण सहा भरारी पदके नियुक्त करण्यात आले आहेत. तर तालुकास्तरावर प्रत्येक तालुका स्तरावर, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्या स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये कोणतेही झेरॉक्स दुकाने उघडी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत येता यावे यासाठी रस्त्यांवर असलेल्या शाळांच्या परिसरातील वाहतूक सुरळीत राहील याचे नियोजन करण्यात आले आहे.

16 संवेदनशील केंद्र
जिल्ह्यात दहावी व बारावी बोर्डाच्या परिक्षासाठी 16 संवेदनशील केंद्र आहेत. सर्वाधिक संवेदनशील केंद्र पाथर्डी तालुक्यात 6, तर शेवगाव, नगरमध्ये 3, जामखेड, नेवासे, कोपरगाव व श्रीगोंदा येथे प्रत्येकी 1 असे 16 केंद्र असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news