पिंपरी : आचारसंहिता कक्षाकडून बॅनर्सवर कारवाई

पिंपरी : आचारसंहिता कक्षाकडून बॅनर्सवर कारवाई

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता कक्षाकडून 4 हजारांपेक्षा अधिक पोस्टर, बॅनर्स आणि तत्सम फलकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. 26 फेब्रुवारी रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहिता सुरू आहे. त्यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध कक्ष स्थापन केले आहेत.

आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी विविध पथकांमार्फत प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. निवडणुकीसंबंधी कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारांची बाब निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सर्व पथक प्रमुखांना दिले आहेत. आचारसंहिता कक्षाकडून सार्वजनिक जागेवरील 275 पोस्टर, 174 बॅनर्स, 3724 झेंडे व फलक अशा सुमारे 4173 पोस्टर, बॅनर्स आणि तत्सम फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.

शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा प्रचार खर्च
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये इतकी आहे. मतदार संघामध्ये एकूण 28 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडीओ नियंत्रण व पाहणार्‍या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जात आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलिसांमार्फत विविध तपासणी नाक्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकियेवर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

9 सभा 18 रॅलींना परवानगी
उमेदवारांच्या सुविधेसाठी कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना केली आहे. विविध पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयामार्फत दि. 16 फेब—ुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार 9 सभांना परवाने देण्यात आले आहेत. तर 18 रॅली व मिरवणुका, 95 वाहन परवाने, 11 तात्पुरते पक्ष कार्यालय परवाने आणि 33 जाहिरात फलक परवाने देण्यात आले आहेत. सी-व्हिजिल अ‍ॅपवर एकूण 12 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाकडे प्राप्त होणार्‍या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news