नगर : दंगल उसळल्याने ग्रामस्थांची धांदल..!

नगर : दंगल उसळल्याने ग्रामस्थांची धांदल..!

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  सायंकाळची वेळ, गावातील मुख्य चौकात उपस्थित असलेले गावकरी आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक चाहूबाजूच्या रस्त्यांनी, गल्ली बोळातून मोठमोठ्याने घोषणा देत जमाव पळत आला. त्यांनी आक्रमक होत मोठमोठ्याने प्रक्षोभक घोषणा देण्यास सुरुवात केली. तेवढ्यात सायरन वाजवित पोलिसांचा मोठा फौजफाटाही गावात दाखल झाला. जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. मग, पोलिसांनी दंगल नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर जोरदार लाठीमार केला आणि दंगल नियंत्रणात आणली. नगर तालुक्यातील अरणगाव व वाळकी गावांत गुरूवारी (दि.16) सायंकाळी घडलेल्या या घटनेने दोन्ही गावांतील गावकरी चांगलेच भयभीत झाले होते. मात्र, थोड्यावेळाने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हे नगर तालुका पोलिसांचे मॉक ड्रिल (दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक) असल्याचे समजल्यावर गावकर्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या (दि.19) साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावागावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने तालुक्यातील संवेदनशील असलेल्या अरणगाव व वाळकी गावात गुरुवारी (दि.16) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, उपनिरीक्षक रणजीत मारग, उपनिरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार व महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा यांनी हे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक केले.

ही दंगल नियंत्रण प्रात्यक्षिके सायंकाळी 5.30 ते 7 वाजेपर्यंत अरणगाव येथे व त्यानंतर सायंकाळी 7.15 ते रात्री 8.15 वाजेच्या कालावधीत वाळकी गावात करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना शिवजयंतीच्या उत्सवात गावात अचानक दंगल उसळली तर काय करावे, याचे हे प्रात्यक्षित असल्याचे सांगण्यात आले. तसेच, पोलिस पथकाने गावातील मुख्य रस्त्यांवरून संचलनही केले. शिवजयंती उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था पायदळी तुडविली जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. कायद्याचे पालन करावे. उत्सवादरम्यान सामाजिक शांतता भंग करणार्‍यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी सानप यांनी दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news