नगर : महाशिवरात्रीनिमित्त वृद्धेश्वर यात्रा ; देवस्थान समितीकडून तयारी पूर्ण | पुढारी

नगर : महाशिवरात्रीनिमित्त वृद्धेश्वर यात्रा ; देवस्थान समितीकडून तयारी पूर्ण

मढी : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे महाशिवरात्रीनिमीत्त राज्यातून विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक वृद्धेश्वर येथे येतात. आज (शनिवारी) होणार्‍या महाशिवरात्री यात्रेची जय्यत तयारी देवस्थान समीतीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश पालवे यांनी दिली. श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक स्वयंभू शिवपिंडीच्या दर्शनासाठी येतात. नाथ सांप्रदायाचे जन्मस्थान म्हणून या स्थानाचे महत्त्व शिव व नाथभक्तांमध्ये वेगळे आहे. गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये वसलेल्या स्थानाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीच असून इसवी सन 1109 मध्ये राजा रामदेवराय यांनी भव्य अशी पंचधातूची मोठी घंटा अर्पण केल्याचा उल्लेख घंटेवरच कोरलेला आहे.

नवनाथ भक्तिसार, शंकर गीता नाथ संप्रदायाचा इतिहास आपले वेद, आपली पुराणे, वारकरी संप्रदायावरील विविध संत साहित्यांमधील संशोधित लिखाण, महाराष्ट्र की शिव सांप्रदायिक परंपरा अशा विविध ग्रंथांबरोबरच कॅप्टन जी.के प्रधान यांनी लिहिलेल्या साथ देती हिमशिखरे या पुस्तकातही वृद्धेश्वराच्या स्थानाचे माहात्म्य वर्णन केले आहे. शिवरात्रीच्या दिवशी नगर, वांबोरी, घाटशिरस, औरंगाबाद, पुणे येथील साधक पैठणहून कावडीने गंगाजल आणतात.

त्याची मिरवणूक व देवाची पालखी सायंकाळी निघून मध्यरात्री महापूजेने उत्सवाची सांगता होते. येथे येणारे भावीक मढी, मायंबा, वृद्धेश्वर अशी यात्रा करतात.दरम्यान, आजच्या यात्रेसाठी नगर, पाथर्डी, शेवगाव, आष्टी, पैठण येथून जादा बसेसची सोय उपलबध असणार आहे. यंदा देवस्थान समितीने गाभार्‍यातील दर्शन रांगा व जाळ्यांचे अत्यंत सुंदर काम केले आहे. देशात वृद्धेश्वर शिवाय अष्टमहासिद्धींचे स्वयंभू स्थान अन्यत्र कोठेही नाही.

महाशिवरात्र यात्रा पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या वतीने दर्शन मंडप, वाहनतळ, दर्शन मार्गसह विविध कामे पुर्ण झाली आहेत. भावीकासाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, निवास व्यवस्था उपलब्ध आहे. दर्शन रांगांसाठी मंदीराच्या पश्चिम द्वारासमोरील दर्शन रांगांसाठी बॅरिकेट्स टाकण्यात आले आहे.

Back to top button