नगर : स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड जाहीर, सर्वच पक्षांकडून बेरजेचे राजकारण | पुढारी

नगर : स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड जाहीर, सर्वच पक्षांकडून बेरजेचे राजकारण

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीसाठी शुक्रवारी (दि. 16) महासभा झाली. प्रदेशपातळीच्या नेत्यांचा आदेश डावलून आणि ज्येष्ठ नगरसेवकांना बाजूला करीत काही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी नवख्यांना स्थायी समिती सदस्यपदाची संधी दिली. शिवसेना तीन, भाजप दोन, राष्ट्रवादी काँग्रेस तीन व बसपा एक अशा नऊ सदस्यांची निवड महापौर रोहिणी शेंडगे यांनी जाहीर केली. महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडीसाठी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. व्यासपीठावर उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला पीठासन अधिकारी महापौर रोहिणी शेंडगे यांनी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी सभापतिपदासह सदस्यपदाचा राजीनामा दिला असून, तो मंजूर करण्यात येत आहे, असे जाहीर केले.

त्यानंतर सर्वच पक्षांच्या गटनेत्यांना त्यांनी निवडलेल्या सदस्यांची नावे बंद पाकिटात देण्याच्या सूचना केल्या. राष्ट्रवादीचे गट नेते संपत बारस्कर, भाजप गटनेत्या मालनताई ढोणे, शिवसेनेच्या गटनेत्या महापौर रोहिणी शेंडगे, बसपचे गटनेते मुद्दसर शेख यांनी पक्षाच्या सदस्यांची नावे बंद पाकिटात दिली. त्यानंतर महापौर रोहिणी शेंडगे यांनी ती नावे सभागृहात जाहीर केली. दरम्यान, भाजपकडून सर्वच नगरसेवक इच्छुक होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे नगरसेवक प्रदीप परदेशी व पल्लवी जाधव यांची निवड करण्यात आली. बसपाकडून गट नेते मुद्दसर शेख यांनी पुन्हा आपलेच नाव दिले. त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सभापतीपद डोळ्यासमोर ठेवून सदस्य निवड
दहा ते पंधरा दिवसांपासून शिवसेनेत स्थायी समिती सदस्य पदासाठी रस्सीखेच सुरू होती. एका ज्येष्ठ नगरसेवकांनी प्रदेशापातळीवर जाऊन स्थायी समितीत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसा प्रदेशवरून निरोपही आला होता. मात्र, प्रत्यक्षात निवडीच्या वेळी त्या ज्येष्ठ नगरसेवकांचे नाव गायब झाले. तसेच, शिवसेनेतील काही अनुभवी लोकांनीही सदस्यपदासाठी फिल्डिंग लावली होती. परंतु, सभापतिपदाची निवड डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने नव्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.

यांना स्थायीचा चान्स
संपत बारस्कर (राष्ट्रवादी)
सुनील त्रिंबके (राष्ट्रवादी)
नजीर शेख (राष्ट्रवादी)
कलम सप्रे (शिवसेना)
सुवर्णा गेणप्पा(शिवसेना)
सुनीता कोतकर (शिवसेना)
पल्लवी जाधव (भाजप)
प्रदीप परदेशी(भाजप)
मुद्दसर शेख (बसपा)

Back to top button