नगर : नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात कोतुळचे मुख्याध्यापक, शिक्षक ठार | पुढारी

नगर : नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात कोतुळचे मुख्याध्यापक, शिक्षक ठार

टाकळी ढोकेश्वर : नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील धोत्रे गावच्या शिवारात बस-कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कोतूळ येथील मुख्याध्यापकांसह शिक्षकाचा मृत्यू झाला. कारमधील शिपाई गंभीर जखमी झाला आहे. आज शुक्रवारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नामदेव दादाभाऊ बर्वे (वय 52, रा. कोतूळ, ता. अकोले) आणि ईश्वरचंद्र रामचंद्र पोखरकर (वय 51, रा.कळंब, ता. अकोले) अशी मृत दोघांची नावे आहेत. बर्वे हे अकोले तालुक्यातील कोतुळ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक तर पोखरकर हे सहाय्यक शिक्षक होते. अविनाश कुंडलिक पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. ते शाळेत शिपाई असल्याचे समजते.

मुरबाड आगाराची एसटी बस (एमएच.20,बीएल-2457)कल्याणहुन अहमदनगर येत होती. अल्टो कारने (एमएच.17,एझेड-3491) मधून बर्वे, पोखरकर हे नगरहून आळेफाटाकडे जात होते. धोत्रे गावच्या शेख वस्ती नजीक अल्टो कार -बसची समोरासमोर धडक झाली. कारमधील शिक्षक ईश्वरचंद्र रामचंद्र पोखरकर (मुळ गाव नारायणगाव) व नामदेव दादाभाऊ बर्वे हे जागीच ठार झाले. अपघात एवढा भयानक होता की अल्टो कारचा चक्काचुर झाला. अपघातात मृतांच्या डोक्याचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता.

अपघाताचा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा दरवाजा तोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेची माहीती मिळताच आमदार निलेश लंके प्रतिष्ठाणचे बाळासाहेब खिलारी,रामभाऊ उर्फ किरण तराळ, अंकुश पायमोडे, दत्ता निवडुंगे, भोंद्रेचे सरपंच अभिषेक झावरे,पप्पू कसबे, सुधीर भांड, मेजर सासवडे यांनी यांनी मृतदेह कारमधून बाहेर काढून तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी पवारला अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डाँ.सतिष लोंढे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

 

Back to top button