नगर : कोतवालीचा हवालदार लाचेच्या जाळ्यात | पुढारी

नगर : कोतवालीचा हवालदार लाचेच्या जाळ्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा : रेशनचा तांदूळ खरेदी केल्याच्या गुन्ह्यात आरोपींमध्ये नाव येवू नये याकरीता 50 हजारांची लाच मागणारा कोतवाली पोलिस ठाण्याचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.16) ही कारवाई केली असून, लाचखोर हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ पंडित निपसे (वय 42) असे गुन्हा दाखल झालेल्या लाचखोर हवालदाराचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी रेशनचा तांदूळ खरेदी करणार्‍या मार्केट यार्डातील एका व्यापार्‍याला कोतवाली पोलिसांनी अटक केली होती..

संबंधित व्यापार्‍याने तांदूळ ज्यांच्याकडून खरेदी केला त्यांची नावे पोलिसांना दिली. त्याचा तपास हवालदार निपसे याच्याकडे देण्यात आला होता. रेशनचा तांदूळ व्यापार्‍याला विक्री करणार्‍या नगर तालुक्यातील एका किराणा दुकानदाराला चौकशीसाठी बोलावून त्याच्या मुलाचे नाव गुन्ह्यात न घेण्यासाठी व अटक न करण्यासाठी हवालदार निपसे याने 50 हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबतची तक्रार संबंधित किराणा दुकानदाराने एसीबीकडे केल्यानंतर पोलिस ठाण्यात ट्रप लावण्यात आला होता. पथकासमोर लाचेची मागणी केल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button