नगर : काष्टीकरांचा महावितरण अभियंत्यांना घेराव

नगर : काष्टीकरांचा महावितरण अभियंत्यांना घेराव

काष्टी :  पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असतानाच शेतातील उभी पिके वीज वेळेवर येत नसल्यामुळे पाण्याअभावी जळून चालली आहे. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी काल दुपारी महावितरणचे अभियंता एस.एम.बारगळ यांना घेराव घालून, आंदोलनाचा इशारा दिला. श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात मोठे आणि बागायत गाव म्हणून काष्टी गावची ओळख आहे. येथे घोडनदी, भिमानदी, तसेच घोड कॅनालचे पाणी असल्यामुळे या भागात ऊस, कांदा, गहू,हरभरा, द्राक्षे, डाळींब, खरबूज, कलिंगड, काकडी, या सारखी पिके शेतकर्‍याने मोठ्या कष्टाने केली आहे. येथील विहिर, शेततळे, बोरला पाणी आहे. परंतु वीज वेळेवर नसल्यामुळे चांगली पिके हातची जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

येथील शेतकर्‍यांना दर आठ दिवसांनी वेगवेगळ्या शिप्टमध्ये फक्त आठ तास वीज दिली जाते. यामध्ये त्यातील फक्त दोन ते तीन तास वीज मिळते. दरदहा मिनिटाला वीज झटके मारते. यामुळे विद्युत पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकर्‍यांच्या मोठे नुकसानीला जबाबदार कोण? विद्युत रोहित्र त्याची केबल खराब झाली तर शेतकर्‍यांना स्वतःच्या खर्चाने ती दुरूस्ती करावी लागते. वीज वितरणचे कर्मचारी वेळेवर शेतकर्‍यांना सहकार्य करित नाही. विद्युत रोहित्र खराब झाले, तर कर्मचारी दुरूस्तीला येत नाहीत. खाजगी कर्मचार्‍यांना बोलावून दुरूस्ती करावी लागते.

यामुळे शेतकरी अडचणीत आहे. काष्टी सबस्टेशन सर्वात मोठे असून वीजेचा भार जास्त आहे. तरी अधिकारी वर्ग यावर उपाययोजना करताना दिसत नाही. भारनियमन कमी झाले नाही आणि एक सारखी वीज शेतकर्‍यांना मिळाली नाही, तर आठ दिवसांत सर्व शेतकरी काष्टी सबस्टेशनवर येवून ठिय्या आंदोलन करणार, असा पवित्रा येथील शेतकर्‍यांनी घेतला आहे. यासाठी काल गुरुवारी सहकार महर्षी संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते, संतोष पाचपुते, बंडू गवते, लालासाहेब दांगट, सदस्य विशाल दांगट, सुनिल कोकाटे, रविंद्र दांगट, प्रशांत कळसकर, विशाल दांगट,यांच्यासह तरुण शेतकर्‍यांनी अभियंता बारगळ याची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले.

नवीन सबस्टेशनवरून त्यांना वीज द्या
काष्टी सबस्टेशनवरुन चिंभळा, बेलवंडी येथे वीज वितरण होते. आता गेली अनेक वर्षांपासून चिभंळा, हंगेवाडी, बेलवंडी या भागात नवीन सबस्टेशन झालेले असताना त्यांना काष्टी येथून जाणारी वीज बंद करुन स्थानिक सबस्टेशनवरुन द्यावी. यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी बबनराव पाचपुते व नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news