नगर : ‘लाल’ कांद्याने केला शेतकर्‍यांचा वांदा | पुढारी

नगर : ‘लाल’ कांद्याने केला शेतकर्‍यांचा वांदा

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  गुजरात, पश्चिम बंगालमधील सुखसागर, राजस्थान अलवर व शिखर राजस्थान येथे मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक झाल्याने शेतकर्‍यांचे मुख्य पीक असलेल्या कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. कोपरगाव मुख्य बाजार समितीत व शिरसगाव येथील बाजार समितीचे आजचे भाव 350 ते 650 रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. कांदा केंद्र शासनाने निर्यात करावा व कांद्याला व शेतकर्‍यांना भाव मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. सध्या द्राक्षाचा सीझन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने कांदा वाहतुकीसाठी वाहने मिळत नाही त्यांनीही भाव वाढवले आहेत. दुबई मलेशिया सिंगापूर श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होत असतो.

सध्या रेल्वे ट्रॅकद्वारे पटना, सिलिगुडी, गुवाहाटी, कलकत्ता, मालदा येथे दररोज 16 हजार क्विंटल कांदा जात आहे. परंतु भाव नसल्याने तेथेही कांद्याला मार्केट नाही. असे कोपरगावचे कांदा व्यापारी महेंद्र ठक्कर यांनी सांगितले. कांद्याने पुन्हा शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. विविध बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले गेले आहेत. कांदा हा आहारातील महत्वाचा घटक आहे मात्र. हा कांदा सध्या सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. नाशिक, नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून कांदा पिकाचे भरघोस उत्पन्न घेतले जात असून सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक मधील लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती, नाशिक बाजार समिती, यांसह येवला, मनमाड, उमराणे, तसेच नगर जिल्ह्यात कोपरगाव व विविध ठिकाणी बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
कवडीमोल भावाने कांद्याची विक्री करावी लागत असल्याने उत्पादन खर्च कसा मिळवायचा हा प्रश्न शेतकर्‍यांना पडलेला आहे. बाजार समितीमध्ये आल्यानंतर कांद्याची किंमत अत्यंत कवडीमोल भावात व्यापारी करत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगावची ओळख आहे. या ठिकाणीच वाईट परिस्थिती निर्माण झाली असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

कोपरगाव मुख्य बाजार समिती 280 क्विंटल कांदा आयात होऊन त्यास 350 ते 650 रुपये भाव मिळाला आहे. तर उपबाजार समिती शिरसगाव येथे 4400 क्विंटल कांदा व कोण त्यासही तोच भाव मिळाला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण
साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान लाल कांदा बाजारात येऊ लागतो. लाल कांद्याची आवक बघून बाजार समितीमध्ये कांद्याचे दर व्यापारी ठरवले जातात. मात्र, यंदाच्या वर्षी 2 ते 3 हजारापर्यंत असणारे लाल कांद्याचे दर आता 1 हजाराच्या खाली येऊन ठेपले आहे. लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव 600 ते 800 रुपये पर्यंतखाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने चिंताग्रस्त झाला आहे.

Back to top button