नगर : जेऊर सरपंचपदाचा आज फैसला | पुढारी

नगर : जेऊर सरपंचपदाचा आज फैसला

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड आज गुरुवार दि. 16 रोजी होणार आहे. सरपंचपदासाठी ज्योती तोडमल यांचे नाव आघाडीवर असून ग्रामपंचायत सदस्य सहलीवर गेलेले आहेत. जेऊर ग्रामपंचायतीमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले गटाची सत्ता आहे. निवडणुकीनंतर ठरल्याप्रमाणे राजश्री मगर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदासाठी आज सरपंच निवडीचा कार्यक्रम ठरलेला आहे.

ठरविण्यात आलेल्या फॉर्मुल्यानुसार ज्योती बाबासाहेब तोडमल यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्व सदस्य एकत्र असले तरी अचानक वेळी दगा फटका नको म्हणून ग्रामपंचायत सदस्य सहलीला गेलेले आहेत. त्यांच्यासोबत गावातील जेष्ठ कार्यकर्ते गेले असल्याने सरपंच निवडीचा फैसला घेतला जाणार आहे. सरपंच निवड बिनविरोध होते की आणखी कोणी सरपंचपदासाठी अर्ज दाखल करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी गावच्या विकासासाठी निवडणुकीनंतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांना एकत्र आणले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित आहे. सरपंच पदासाठी इतर अर्ज दाखल झाल्यास ग्रामपंचायत सदस्यांमधील गटबाजी समजून येणार आहे. सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सरपंच पदासाठी मीना पवार, वंदना विधाते या महिला ग्रामपंचायत सदस्याही इच्छुक आहेत. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच सरपंच पदी कोणाची वर्णी लागणार हे निश्चित होणार आहे.

Back to top button