नगर : विविध गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार गजाआड | पुढारी

नगर : विविध गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार गजाआड

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा :  विविध गुन्ह्यातील सराईत आरोपीस श्रीरामपूर तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असून आरोपीस पोलिस ठाण्यात आणून अटक केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचेे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना गुप्त बातमी मिळाली की, मौजे माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील वारंवार चोरीचे गुन्हे करणारा व श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सुजित अनिल आसने हा माळवाडगाव येथे आपली ओळख लपवून फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने स.पो.नि.थोरात यांनी तत्काळ एक पथक तयार करून त्यातील सर्वांना वेषांतर करून माळवाडगाव गावात सापळा रचला.

यावेळी आरोपी सुजित अनिल आसने हा त्याच्या मोटारसायकलवर येताना दिसला असता त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो मोटारसायकल रस्त्यात सोडून गावाच्या बाहेर ऊसाच्या शेतात पळून जात असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास मोठ्या शिताफीने पकडले.

या सराईत गुन्हेगारास राकेश ओला, पोलिस अधीक्षक नगर, स्वाती भोर, अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर आणि संदीप मिटके, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलिस उपनिरीक्षक संजय निकम, अतुल बारसे, पो.हे.काँ.नवनाथ बर्डे, पो. हे. कॉ. राजेंद्र लवांडे, पोलिस नाईक, अशोक पवार, आबासाहेब गोरे, प्रशांत रणनवरे, अनिल शेंगाळे, पो.काँ.संतोष कराळे, संदीप पवार, चालक पो.काँ चांदभाई पठाण यांनी कारवाई केली.

आरोपीवर 11 गुन्हे
आरोपी सुजित अनिल आसनेसह तेजस (रा. माळवाडगाव ता. श्रीरामपूर) यांच्यावर श्रीरामपूर शहर, तालुका तसेच विरगाव पोलिस ठाणे (ता. वैजापूर) येथे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. या आरोपीच्या मागावर वैजापूर तालुक्यातील विरगाव येथील पोलिसही होते.

 

Back to top button