नगर : जानेवारी महिन्याचा पगार रखडला ; एसटी कर्मचार्‍यांची आर्थिक तारांबळ | पुढारी

नगर : जानेवारी महिन्याचा पगार रखडला ; एसटी कर्मचार्‍यांची आर्थिक तारांबळ

नगर : पुढारी वृत्तसेवा : पगाराची तारीख उलटून गेली तरीही पगार झाले नसल्यामुळे जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या साडेतीन हजार कर्मचार्‍यांची आर्थिक तारांबळ झाली. या कर्मचार्‍यांवर उसणवारी करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात जवळपास साडेतीन हजार अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला पगार होतो. एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात असताना देखील पगार वेळेवर होत होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भावाने महामंडळाचे आर्थिक गणितच बिघडून टाकले. त्यामुळे कर्मचार्‍यांचे पगार लांबणीवर पडू लागले.

कर्मचार्‍यांच्या पगारासाठी राज्य शासनाने जबाबदारी घेतली. त्यानुसार शासनाकडून पगारापोटी रक्कम उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे पगार वेळेवर होण्याचा मार्ग मोकणा झाला. या नवीन वर्षाच्या पहिल्या जानेवारी महिन्याचा पगार मात्र, 7 तारीख उलटली तरी झाला नाही. महामंडळाला दिलेल्या निधीच्या खर्चाचे विवरण पत्र शासनाने मागितले. परंतु ते अद्याप ते दिले गेले नाही. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे पगार रखडले आहेत. महामंडळ आर्थिक गर्तेत सापडल्यामुळे कर्मचार्‍यांची आर्थिक परिस्थिती देखील खालावली आहे. जानेवारी महिन्याचा पगार वेळेवर झाला नसल्यामुळे कर्मचार्‍यांची तारांबळ सुरु झाली आहे. घर, वाहन यांचे हप्ते थकले आहेत. आजारीपण, मुलांचा शालेय खर्च कसा भागवावा असा प्रश्न कर्मचार्‍यांना पडला आहे. वाढत्या महागाईमुळे अगोदरच त्रस्त झालेले कर्मचारी पगार रखडल्याने चिंतातूर झाले आहेत.

Back to top button