नगर : हरियाणा टू नगर… तीन लाख ! ‘दारा’ रेड्याच्या मालकाला जिल्हा परिषदेने केले अदा | पुढारी

नगर : हरियाणा टू नगर... तीन लाख ! ‘दारा’ रेड्याच्या मालकाला जिल्हा परिषदेने केले अदा

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर येथे झालेल्या ‘अहमदनगर महोत्सवा’साठी 60 लाखांच्या खर्चाची तरतूद केल्यानंतर मोठ्या थाटामाटात महोत्सव पार पडला. त्यातून 10 कोटींच्या पुढे उलाढालही झाली आहे. महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘दारा’या रेड्याला हरियाणातून नगरला आणण्याकरीता भाड्यापोटी जिल्हा परिषद प्रशासनाने तब्बल तीन लाखांचा खर्च केल्याची महिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात अहमदनगर महोत्सव आनंदात पार पडला.

या पाच दिवसांत साईज्योतीच्या 300 बचत गटांच्या स्टॉलमधून 5 कोटी 15 लाखांची उलाढाल केली, मात्र दुसरीकडे कृषी विभाग जेमतेम सव्वा कोटींपर्यंत्तच पोहचू शकल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्याकडून 3 कोटी 30 लाखांचे बुकींग झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात किती खरेदी होईल, याविषयीही साशंकता आहे. दुसरीकडे पशुसंवर्ध विभागाने नगरकरांना पाहण्यासाठी आणलेला हरियाणातून आणलेला ‘रेडा’ हा कुतूहलाचा विषय ठरला.

12 कोटी रुपये त्याचीं किंमत असल्याचेही सांगितले गेले. हा रेडा नगरला आणण्यासाठी तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक रक्कम मोजल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, नगर पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्‍यांनीही संबंधित रेड्याच्या मालकाला तीन लाख रुपये अदा केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. अन्य जनावरांची बिले अजून बनविलेली नसल्याचे सांगण्यात आले.

250 पेक्षा अधिक सिमेन्स किटची विक्री
नगरला आलेल्या ‘दारा’ या रेड्याच्या सिमेन्सचीही विक्री झाली. अनेक पशुसेवकांनी या सिमेन्स किटची खरेदी केल्याचेही पशुसंवर्धन विभागकडून सांगण्यात आले. त्यामुळे येणार्‍या काळात नगरमध्येही या जातीच्या वळू-म्हशींची पैदास पहायला मिळणार आहे.

 

Back to top button