नगर : अक्षय कर्डिलेंसह 75 जणांविरोधात गुन्हा ; गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेबांच्या सेनेचा रास्तारोको | पुढारी

नगर : अक्षय कर्डिलेंसह 75 जणांविरोधात गुन्हा ; गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेबांच्या सेनेचा रास्तारोको

नगर : पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव लांडगा येथील लग्नात झालेल्या ‘धक्क्या’वरून केडगावात रात्री भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत राडा झाला. अक्षय कर्डिले यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हॉटेलवर दगडफेक केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी बाळासाहेबांच्या सेनेने रास्तारोको केला. दरम्यान पोलिसांत अक्षय कर्डिलेसह दोन्ही गटाच्या 75 जणांविरोधात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे पुत्र ओंकार यांच्यात पिंपळगाव लांडगा येथील विवाहात वाद झाले. तेथेच दोन्ही गटात जुंपली. त्याची फिर्याद निखिल अशोक कापसे (रा.बेरडगल्ली, भिंगार) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. ओंकार दिलीप सातपुते, सुनील सातपुते, अनिकेत शिर्के (सर्व रा. केडगाव) यांच्यासह 10 ते 15 जणांनी विवाह समारंभात लाकडी दांडक्याने मारहाण केली.‘तू कर्डिलेचा खूप उदो उदो करतो, त्याचे व भाजपा पक्षाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकतो, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कापसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या मारहाणीत निखिल कापसे व संजय धोत्रे हे दोघे जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.केडगावातील हॉटेल रंगोलीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी विठ्ठल नानाभाऊ सातपुते यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास अक्षय शिवाजी कर्डिलेंसह 50 ते 60 जणांच्या जमावाने हॉटेलवर दगडफेक केली. या दगडफेकीत हॉटेलसमोर ग्राहकांच्या वाहनांच्या काचा फुटल्या तर काहींना दुखापत झाली आहे. या तक्रारीवरून अक्षय कर्डिलेसह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगावचे रस्ते जाम
रंगोली हॉटेलवर दगडफेक करणार्‍या आरोपींवर कारवाईसाठी पुणे महामार्गावर बाळासाहेबांच्या सेनेने ठिय्या दिला. यामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांचा फौजफाटा पाहताच तेथील रास्तारोको बायपास चौकात हलविण्यात आला. त्यामुळे पुणे रस्त्यासह बायपास रस्ते जाम झाले. परिणामी वाहतूक कोंडी झाली. गुन्हा नोंदविल्यानंतर आंदोलकांनी रस्ता रिकामा करून दिला.

Back to top button