नगर : कुत्र्यावरून दोन गटात तुंबळ हाणामार्‍या | पुढारी

नगर : कुत्र्यावरून दोन गटात तुंबळ हाणामार्‍या

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  कुत्र्याने शेतातील डोंगळ्याचे नुकसान केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली.या हाणामार्‍यात मुलासह आई गंभीर जखमी झाली असल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर शिवारातील चितळकर वस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर शिवारातील चितळकर वस्तीवरील राहुल शिवाजी देवकाते यांनी आपल्या शेतात कांदा बी तयार करण्यासाठी डेंगळे लावलेले आहेत. या डोंग ळ्याच्या शेतामध्ये संदीप भागा देवकाते यांचे कुत्रे येऊन नुकसान करत असल्याचे राहुल देवकाते यांनी पाहिले असता त्यांनी संदीप देवकाते यांना ‘तुमचे कुत्रे बांधून ठेवा, ते शेतात येऊन नुकसान करत आहे,’ असे सांगितले. याचा राग अनावर झाल्यामुळे संदीप याच्यासह अनिता संदीप देवकाते, विशाल संदीप देवकाते, चेतन संदीप देवकाते यांनी राहुल आणि त्यांची आई लता यांना शिवीगाळ करुन लाथबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच संदीप व अनिता देवकाते यांनी लाकडी दांडक्याने आणि गजाने मारहाण केली तर विशाल व चेतन देवकाते यांनी दगड मारुन जखमी केले.

याबाबत राहुल देवकाते यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संदीप भागा देवकाते, अनिता संदीप देवकाते, विशाल संदीप देवकाते, चेतन संदीप देवकाते या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Back to top button