नगर : उसतोडणी कामगारावर बिबट्याचा हल्ला | पुढारी

नगर : उसतोडणी कामगारावर बिबट्याचा हल्ला

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वैजापूर सुराळा आणि कोपरगाव तळेगांवमळे शिवाराच्या हद्दीतील शेतात उसतोडणी करताना कामगार अशोक कारभारी दळवी यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या डोळयास व डाव्या हाताच्या अंगठ्यास इजा झाली आहे.  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळवर उसतोडणीच्या कामासाठी मुकादम उत्तम पुंजाजी पगारे यांनी जळगाव जिल्ह्यातील भायगांव येथील उसतोडणी कामगारांची टोळी आणली आहे. त्यातील अशोक कारभारी दळवी हे बुधवारी भल्या पहाटे तळेगांवमळे शिवारात उसतोडणीसाठी गेले होते.

पहाटे 4 वाजता सिकंदरभाई यांच्या शेतात उसतोडणीचे काम करत होते. उसाच्या पाचटामध्ये दडून बसलेल्या बिबट्याने अचानक अशोक दळवी यांच्या हातावर आणि डोळयावर हल्ला केला. त्यात त्यांच्या डाव्या डोळयाच्या खाली इजा झाली. अशोक दळवी यांनी वेळीच स्वत:ला सावरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा त्यांच्या जीवीतास मोठा धोका झाला असता. कोपरगाव तालुक्यात बहुसंख्य गावात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात सुरू असून वनविभागाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा या हिंस्त्रप्राण्यांच्या वावरामुळे लहान मुले- मुली यांच्यात भितीचे प्रमाण वाढून त्यांच्यावर हल्ले वाढतील. शेतकरी शेती कामासाठी धजावत नाही. वनविभागाने वेळीच उपाय योजना कराव्यात.

Back to top button