देवठाण : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील देवठाण येथील वरखडवाडी आणि दोडकनदी या नवीन दोन महसुली गावांना नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याची मागणीचा ठराव उपसरपंच आनंदा गिर्हे यांनी मांडला. यावर ग्रामसभेत सविस्तर चर्चा होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती दोडकनदी आणि वरकरवाडी या गावाला निर्माण कराव्यात याव्यात, असा एकमताने ठराव संमत करण्यात आला. ग्रामपंचायतीने यानंतर महसूल विभागाकडे स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा व त्याचा पाठपुरावा करावा, असेही ग्रामसभेत एकमताने ठरले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच निवृत्ती जोरवर होते. ग्रामपंचायतीची ग्रामसभा अत्यंत गोंधळात पार पडली. या सभेमध्ये अनेक विषय वादळी ठरले. गावातील सुरू असलेल्या दारू मटका व जुगार यासारखे अवैध धंद्याबाबत पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून अनेकांनी या बीट मध्ये काम करणार्या पोलिसांची बदलीची मागणी केली.
गावातील लोकांना अन्नसुरक्षा योजनेत धान्य मिळावे म्हणून अनेक 105 लोकांनी ग्रामसभेकडे अर्ज केले होते. परंतु 35 कुटुंबांनाच या अन्नसुरक्षा यादीत समाविष्ट करता येणे शक्य असल्याने त्या नावांची निवड करण्यात आली. गरीब व भूमीहिन लोकांना संदीप संधी देण्यात आली. देवठाण गावातील सोळा अंगणवाड्यांपैकी काही अंगणवाड्या दररोज उशिरा उघडल्या जातात तर काही अंगणवाडी सेविका सर्व जबाबदारी मदतनिस यांच्यावर टाकतात. त्यामुळे बालकांच्या पोषणावर परिणाम होऊन कुपोषण वाढण्याची दाट शक्यता आहे, असा ठराव महेश सोनवणे यांनी ग्रामसभेत मांडला.
ग्रामसभेनेही अनेकांनी ही बाब सत्य असल्याचे मान्य केले. काही अंगणवाडी सेविका वेळेवर व दररोज अंगणवाडी केंद्रावर जात नाहीत, अशा अंगणवाडी सेविकांवर बालविकास खात्याने रितसर कारवाई करावी म्हणून ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव बालविकास अधिकारी अकोले आणि देवठाण बीटच्या बालविकास विभागाच्या सुपरवायझर यांना ग्रामपंचायतीने पत्र देण्यात यावे, असे ठरले.
देवठाण येथे ग्रामविकास विभागामार्फत सन 2021 मध्ये मंजूर झालेला व काम सुरू असलेला सभामंडप स्लॅबचा करणे ऐवजी पत्राच्या ड्रोनचा करावा व चौकातील सर्व जागा या सभामंडपात घेण्यात यावी, असा ठराव राजेंद्र महाराज कराड यांनी मांडला. यावर खूप वादळी चर्चा झाली. गोंधळ आरडाओरड सुरू झाला. काही जण सभामंडप नको म्हणत होते तर काही लोक हा सर्व मंडप रद्द करण्याऐवजी पत्राचा ड्रोनचा करावा, असे म्हणत होते. यावेळी उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता जाधव यांनी याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती सांगितली.
यावर अगस्ती कारखाना संचालक सुधीर शेळके, माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड तुळशीराम कातोरे, माजी सभापती सुहास कर्डिले व बाजार समितीचे माजी चेअरमन चंद्रमोहन निरगुडे आदींनी ग्रामस्थांची समजूत काढली व स्लॅब ऐवजी पत्राचा सभामंडप करण्याचे ठरले. या बदलाचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लवकरात लवकर सादर करावा, असे सर्व संमतीने ठरले.
ग्रामसभेच्या प्रश्नांना उत्तरे ग्रामविकास अधिकारी राम धनवडे यांनी उत्तरे दिली. यावेळी कामगार तलाठी सावळे उपस्थित होते. याशिवाय सीताबाई पथवे, उषाताई गायकवाड, श्रीकांत सहाने, परसराम शेळके, किसन काकड, राम सहाने, पांडुरंग मेंगाळ, हरिदास जोरवर, किरण शेळके आदींनी चर्चेत भाग घेतला.
महिला ग्रामसभा घेण्याची मागणी
देवठाण गावची महिला ग्रामसभा अनेक दिवसांपासून होत नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर महिला ग्रामसभा घेण्यात यावी. या महिला ग्रामसभेला महिलाच असाव्यात पुरुषांनी लुडबुड करू नये, अशी सूचनाही अनेक ग्रामस्थांनी केली. यावर लवकरात लवकर महिला ग्रामसभा घेण्यात येईल, असे सरपंच व ग्रामसेवक यांनी जाहीर केले. त्यामुळे या विषयावर पडदा पडला.