नगर : तो काम करणार नाही, याला द्या ! जिल्हा परिषदेत ‘आमदारांच्या’ कार्यकर्त्यांचा गोंधळ | पुढारी

नगर : तो काम करणार नाही, याला द्या ! जिल्हा परिषदेत ‘आमदारांच्या’ कार्यकर्त्यांचा गोंधळ

नगर : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन योजनेतून काम मिळाले, कार्यारंभ आदेशही झाला. मात्र, आता ‘मी हे काम करू शकत नाही’ असे संबंधित ठेकेदारांचे पत्र आणून ‘ते’ काम दुसर्‍या ठेकेदाराला देण्याचा कार्यकर्ते आग्रह धरत आहेत. सोमवराी एका लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यानेही असेच पत्र आणून पाणी पुरवठा विभाग डोक्यावर घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.  जलजीवन मिशन योजना चांगलीच चर्चेत आहे. खोटे प्रतिज्ञापत्र, बनावट बीड कॅपिसिटी, क्लबची कामे, टेंडर मॅनेज, अशा अनेक तक्रारींसोबतच प्रत्येक कामांत अधिकार्‍यांची असलेली भागीदारी, असेही तोंडी आरोप होत आहे.

आता निविदा पूर्ण झाल्या आहेत. ज्यांना कामे मिळाली, त्यांचे नावे कार्यारंभ आदेशही दिला जात आहे. मात्र, आता काम सुरू करायचे असतानाच, काही ठेकेदारांचे ‘मी काम करू शकत नाही’ असा आशयाचे पत्र झेडपीत येऊन धडकत आहेत. गत आठवड्यातही असेच पत्र आले, मात्र कार्यकारी अभियंत्यांनी शहानिशा केली असता, त्या पत्रावरील स्वाक्षरी माझी नाहीच, असे ठेकेदाराचे उत्तर आले. तर काही ठेकेदारांनी आमच्यावर दबाव टाकून पत्र घेतली जात असल्याचेही कळविले. त्यामुळे निविदा प्रक्रिया संपली, तरीही काम मिळविण्याची स्पर्धा सुरूच असल्याचे दिसते.

मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास एका लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्याने काम मिळालेल्या एका ठेकेदाराचे लेखी पत्र आणले होते. त्याने कार्यकारी अभियंत्यांना ते पत्र दाखवून ‘तो’ ठेकेदार काम करत नाही, त्यामुळे ‘या’ ठेकेदाराला हे काम करू द्या, असा आग्रह धरला. यावेळी अभियंत्यांनी, आम्हाला ते पत्र पहावे लागेल, त्यावर खरोखरच त्या ठेकेदाराची स्वाक्षरी आहे का, याची खात्री करावी लागेल, तुमचे ऐकले तर आम्ही अडचणीत येवू, असे उत्तर दिले. मात्र ते कार्यकर्ते लगेचच निर्णय घ्या, असा आग्रह धरत होते. बराच वेळ पाणी पुरवठा विभागात हा गोंधळ सुरू होता. हा तणाव चिघळण्याची शक्यता पाहता ‘साहेबां’नीच कार्यालयातून काढता पाय घेतला. मात्र कार्यकर्ते तळ ठोकून होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी कार्यकारी अभियंता गडदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

Back to top button