नगर : नाथकालीन सूर्यकुंड केला चकाचक !

नगर : नाथकालीन सूर्यकुंड केला चकाचक !

मढी : पुढारी वृत्तसेवा : येथील गर्भगिरी डोंगरात असलेल्या नाथकालीन सूर्यकुंडाची (झरा) वन विभागाकडून स्वच्छता करण्यात आली. सूर्यकुंडातील प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, कचरा व गाळ काढून साफसफाई करून परिसर चकाचक करण्यात आला. या श्रमदान मोहिमेत वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. चैतन्य कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांनी गर्भगिरी डोंगरात साधना केली. या डोंगरात धनदर्‍यात नाथकालीन सूर्यकुंड आहे. सुमारे पाच फूट खोल, तीन फूट रुंदीचे खळगे पाण्याने भरलेले असते. शेंडगेवाडी, मढी, करडवाडी शिवारातील डोंगरदर्‍यात चरणारी जनावरे येथे पाणी पितात. यात्रेकरू येथील पाण्याने स्नान करून शिवपूजन करतात. मढी, मायंबा, वृद्धेश्वर असा परिसर नाथपंथांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो.

गर्भगिरी डोंगर दर्‍यांमध्ये अनेक गुहा, निर्जनस्थळे आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या परिसरात अनेक जिवंत पाण्याचे झरे आहेत. कितीही मोठा दुष्काळ असला तरी यातील जलस्रोत आटत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. कडक उन्हाळ्यातही सूर्यकुंडात भरभरून पाणी असते. टंचाई काळात जनावरासह जंगली प्राणीमात्रांची तहान सूर्यकुंडावर भागवली जाते.

सूर्यकुंडासह परिसरातील झरे स्वच्छ करण्याचा निर्धार तिसगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मढी येथील वन कर्मचार्‍यांनी केला असून, शनिवारपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत माजी सरपंच बाबासाहेब मरकड, वनरक्षक संदीप कराळे, वन कर्मचारी विष्णू मरकड, अशोक कुसारे, गणेश पाखरे, समीर मोमीन, हरी भवार, वनपाल गाढवे आदी सहभागी झाले होते.

जलस्रोतांचेही संवर्धन : वाघुलकर
पर्यावरण संवर्धनासह गर्भगिरी डोंगराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी वनविभाग काम करत आहे. मुक्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी येथे पाणवठे केले आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाई असताना हे जिवंत पाण्याचे झरे त्यांची तहान भागवितात. या जलस्रोतांचे संवर्धन केले जात असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news