

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर कोकमठाण शिवारात अपघाताची घटना घडली. भरधाव वेगातील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट पुलाच्या कठड्यावर धडकली. या दुर्घटनेत कारमध्ये एकटेच असलेले चालक बाळासाहेब धरम हे बालंबाल बचावले, मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महामार्ग पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील समृद्धी महामार्गावर कोकमठाण शिवारात दुपारी ही दुर्घटना घडली.
कार चालक धरम एकटेच (एम एच 17 सी एम 4074) या कारमधून औरंगाबादकडून शिर्डीकडे येत होते. कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला संरक्षण कठड्यास धडकली. हा अपघात इतका गंभीर होता की यात संरक्षण कठड्याचा बराच भाग तुटला, परंतु सुदैवाने कार कठड्याला अडकल्यामुळे चालक धरम बचावले. महामार्ग पोलिसांना अपघाताची खबर मिळताच घटनास्थळाहून जखमी धरम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला काढली आहे.