

नगर : पुढारी वृत्तसेवा : महाज्योतीच्या टॅबमुळे अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या प्रशिक्षणाची पुस्तके अपलोड करता येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करता येणार आहे. विद्यार्थी दुसर्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकणार आहेत. टॅब हे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वरदान ठरणार आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरतर्फे जिल्ह्यातील 702 विद्यार्थ्यांना खा.विखे यांच्या हस्ते रविवारी मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाचे नाशिक विभाग उपसंचालक डॉ.भगवान वीर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
महाज्योती या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी, या हेतूने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण, जीईई, नीट, एमएचटी-सीईटी, एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीतर्फे मोफत 961 टॅब प्राप्त झाले आहेत. यापैकी 702 टॅबचे रविवारी वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट सोबत दररोज 6 जीबी इंटरनेटचा डाटा मोफत दिला जातो. डॉ.वीर म्हणाले, महाज्योती मोफत टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटल दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.