नगर : मनपाच्या मुलाखती ठरल्या फक्त फार्स ? चार महिन्यांनंतरही निवडी नाहीत | पुढारी

नगर : मनपाच्या मुलाखती ठरल्या फक्त फार्स ? चार महिन्यांनंतरही निवडी नाहीत

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेत चार महिन्यांपूर्वी मानधन तत्त्वावर जागा भरण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. परंतु, अद्याप कोणाचीही निवड जाहीर झालेली नाही. पदाधिकार्‍यांनी केलेल्या शिफारशींमुळे निवडी लांबल्याची चर्चा होती. परंतु, आता शासनाने महापालिकेत पदभरतीला तत्त्वतः मान्यता दिल्याने मुलाखती दिलेल्या उमेदवारांच्या आशा मावळल्या आहेत. महापालिकेत मानधन तत्त्वावर 17 जागा भरण्यासाठी 541 अर्ज प्राप्त झाले होते. तर, 287 जणांनी मुलाखती दिल्या. महापालिकेत कर्मचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

जुने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. परंतु, त्यांच्या जागी नवीन कर्मचारी भरण्यासाठी मनपाला परवानगी नव्हती. महापालिकेत बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना विभागात अगदी एक ते दोन कनिष्ठ अभियंत्यावर कामकाजाचा कार्यभार आहे. त्यामुळे त्यांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बांधकाम विभागामध्ये अवघे दोन कनिष्ठ अभियंता आहेत. तर, नगर शहरात जवळपास एक लाख 20 हजारांपर्यंतच्या मालमत्ता आहेत. कर वसुलीसह अन्य कामांसाठी कर्मचार्‍यांनी कमतरता भासते. परिणामी त्याचा कामकाजावर परिणाम होतो.

त्यामुळे स्थायी सभेत मंजुरी घेऊन तत्पुरत्या स्वरूपात मानधनावर कनिष्ठ अभियंता नेमण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. 17 ऑक्टोबर रोजी मनपामध्ये मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी 541 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 287 उमेदवारांनी प्रत्यक्षात मुलाखती दिल्या. मुलाखतीसाठी पुणे, औरंगाबाद, बीड, लातूर येथून उमेदवार आले होते. मुलाखती होऊन जवळपास पाच महिना झाले तरी अद्यापि निवड यादी जाहीर झाली नाही.

शिफारशींमुळे प्रशासनाची चालढकल
आपल्या मर्जीतल्या माणसाला मानधन तत्त्वावर नियुक्ती मिळावी, यासाठी अनेक पदाधिकार्‍यांनी मनपा अधिकार्‍यांकडे शिफारशी दिल्या आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या उमेदवारांची निवड करायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिकार्‍यांकडून चलढकल केली जात असल्याची चर्चा आहे.

Back to top button