नगर : सर्वपक्षीय आमदार आमच्या संपर्कात : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर : सर्वपक्षीय आमदार आमच्या संपर्कात : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  सर्वांना आपल्या राजकीय भवितव्यासाठी भाजप हा उत्तम पर्याय वाटत असल्याने शिवसेनाच काय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारसुद्धा आमच्या संपर्कात असल्याचा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे म्हणाले, विरोधी पक्षांतील बहुतांश नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. परंतु, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सेनेचे आता काय फक्त 10-12 लोक शिल्लक राहिले आहेत. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक राजकीय पक्षात भवितव्य अंधारात ढकलण्यासारखे झाल्याने लोक पर्याय शोधत असल्याने भाजप सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उतम पर्याय असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

या पक्षाला उज्ज्वल भवितव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे विशेष आकर्षण यापूर्वी होते आणि आता यामध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संपर्कात आहेत. उद्याच्या दोन पोटनिवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याचे सूतोवाच मंत्री विखे यांनी केले. राज्यपालांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी सुरू केलेल्या कांगाव्याला कोणताही अर्थ नाही. त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसारच राजीनामा मंजूर झाला असेल. खरं तर त्यांची ज्येष्ठता, श्रेष्ठता याचा विचार करुन त्यांचा सन्मान राखण्याचे भान विरोधकांनी ठेवले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

थर्ड अंपायर म्हणून माझे शिर्डीत लक्ष !

शिर्डीमध्ये आयोजित केलेल्या शिर्डी प्रिमियर लिग चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंत्री विखे यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेला शुभेच्छा देताना मंत्री विखे यांनी जोरदार शाब्दीक फटकेबाजी केली. शिर्डीतील सर्वच खेळाडू तरबेज आहेत. कोणी बॅटिंग करतो, कोणी बॉलिंग टाकतो, सर्वांच्या खेळपट्ट्या ठरलेल्या आहेत, पण संघ निश्चित नसल्याने थर्ड अंपायर म्हणून माझे लक्ष असल्याचे ते म्हणाले.

आमदार थोरात यांचे स्वागतच !

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीबद्दल विखे म्हणाले, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नाराजीची फारशी दखल घेतली नाही. काँग्रेसच्या समित्यांचे पुनर्गठन झाले, त्यात त्यांना कुठेही स्थान दिले नाही. कुठं जायचं, यासाठी त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. पण, 'दिल्या घरी सुखी रहा,' असेच मी त्यांना सांगेल. आमच्या पक्षश्रेष्ठींना जर वाटले की, ते पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, तर त्यांचे स्वागतच असल्याचे विखे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news