नगर : टाकळीभानच्या 10 सदस्यांच्या पदाकडे लक्ष | पुढारी

नगर : टाकळीभानच्या 10 सदस्यांच्या पदाकडे लक्ष

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीच्या 10 सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमणाच्या मुद्यावरून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कोर्टात अपात्रेतेची कारवाई झाली. दरम्यान, आता नाशिकचे विभागीय आयुक्त या सदस्यांबाबत काय निर्णय देणार, याकडे टाकळीभान ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिलेल्या निर्णयाविरूद्ध या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. दरम्यान, आयुक्तांकडे दि.10 फेब्रुवारी रोजी चौकशी पुर्ण झाली, मात्र आयुक्तांनी अद्याप अंतिम निर्णय दिला नसल्याने या निर्णयाची प्रतिक्षा 10 सदस्यांसह नागरीकांना लागली आहे.

सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या मुद्यावरुन शिवसेनेचे नेते राधाकृष्ण वाघुले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 10 सदस्यांविरोधात जून 2021 मध्ये दाखल केलेल्या विवाद अर्जाचा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी ऑगष्ट 2022 मध्ये निकाल देत 10 सदस्यांचे सदस्यपद रद्द केले होते. यावर सदस्यांनी या निकालाला आव्हान देत 2 सप्टेंबर रोजी आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.  विभागीय आयक्तांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या निकालाला महिन्याची अंतरीम स्थगिती दिली होती, मात्र 7 ऑक्टोबर 4 नोहेंबर, 2 डिसेंबर, 6 जानेवारी रोजी वेळोवेळी सुनावणी ठेवल्याने ‘तारीख पे तारीख’ सुरु असल्याची चर्चा सुरू होती, मात्र 10 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली.

या सुनावणीचे कामकाज होवून दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तिवाद नोंदवुन घेत या अपात्रतेच्या निकालाची चौकशी पुर्ण केली आहे.
या प्रकरणात सरपंच, उपसरपंचांसह 10 सदस्यांना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दोषी धरुन सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवले होते. नाशिक विभागीय आयुक्तांच्या कोर्टात आता याबाबतची चौकशी पुर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिलेला निर्णय कायम होणार की, त्यात फेरबदल होणार, याकडे आता सदस्यांसह टाकळीभान ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.  विभागिय आयुक्तांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिलेला निर्णय कायम केल्यास या निकालानंतर 10 सदस्य उच्च न्यायालयात धाव घेणार का ? उच्च न्यायालयात या आदेशाला स्थगिती मिळणार का ? हे पहावे लागणार असल्याची चर्चा सध्या टाकळीभानमध्ये ऐकू येत आहे.

17 सदस्य संख्या असलेली मोठी ग्रामपंचायत
श्रीरामपूर तालुक्यातील 17 सदस्य संख्या असलेली मोठी ग्रामपंचायत अशी टाकळीभान ग्रामपंचायतीची गणना होते. लोकसंख्या मोठी असल्याने गावचा विस्तार मोठा आहे. सुमारे दीड वर्षांपासूून सरपंच, उपसरपंचासह 10 सदस्य अपात्रतेच्या कारवाईचा सामना करीत आहेत. एकाच वेळी 10 सदस्य अपात्र झाले तर पेच निर्माण होवून ग्रामविकासाला खीळ बसणार आहे, हे निश्चित!

Back to top button