नगर : मजूर फेडरेशनसाठी आज मतदान ; मतमोजणी लगेच | पुढारी

नगर : मजूर फेडरेशनसाठी आज मतदान ; मतमोजणी लगेच

नगर : पुढारी वृत्तसेवा :  70 कोटीहून अधिक उलाढाल असलेल्या जिल्हा मजूर फेडरेशनच्या 18 जागांसाठी उद्या रविवारी (दि.12) मतदान होत आहे. सत्ताधार्‍यांविरोधात उभा ठाकलेल्या मंडळाला यंदा प्रथमच जिल्ह्यातील दिग्गज आमदारांनी साथ दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. नगर शहरातील गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालयात सकाळी 8 ते 4.30 पर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी रत्नाळे यांनी यंत्रणा सज्ज केली आहे. फेडरेशनच्या सतेसाठी सत्ताधारी अर्जुनराव बोरुडे यांच्या विरोधात पारनेरचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी उमेदवार दिले आहेत. सुरुवातीला 20 जागांसाठी 94 इच्छुक होते.

अर्ज माघारी दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर नगर आणि कर्जतची जागा बिनविरोध काढण्यात सत्ताधारी बोरुडे गटाला यश आले. मात्र त्यानंतरही विरोधी गायकवाड गट हताश झाला नाही. त्यांनी उर्वरित 18 जागांवर लक्ष केंद्रित करत तुल्यबळ उमेदवार दिले. त्यामुळे निवडणुकीतील चुरस निर्माण झाली.  एरवी माजी आ. अरूणकाका जगताप, माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्याभोवती फिरणार्‍या या निवडणुकीत यंदा प्रथमच काही आमदारांनीही विरोधी गायकवाड गटासाठी बैठका घेत रसदही पुरविल्याने निकालाची उत्सुकता लागून आहे.

तालुक्याच्या ठिकाणी स्थानिक आमदारांनी मजूर संस्थांचे ठराव असलेल्या मतदारांशी चर्चा करून कोणाचे ‘काम’ करायचे, याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.  प्रचारादरम्यान, सत्ताधार्‍यांनी मजूर संस्थांना काम वाटपात दिलेला न्याय निदर्शनास आणून दिला, तर विरोधकांनी सत्ताधारी मंडळी निवडणुका संपल्यानंतर कशा प्रकारे पोळी भाजून घेतात, हे मतदाराना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज होणार्‍या मतदानातून मजूर फेडरेशनवर सत्ता कोणाची, हे सायंकाळी निकालानंतर समजणार आहे.

लक्ष्यवेधी लढती
नगर शहर – अर्जुन बोरुडे विरोधात अशोक सोनवणे, पारनेर – प्रशांत गायकवाड विरोधात बाळासाहेब ठुबे, श्रीगोंदा – अनिल पाचपुते विरोधात अनिल दांगट, नेवासा – सुरेश बानकर विरोधात तान्हाजी गायकवाड, राहुरी – नामदेव ढोकणे विरोधात विजय तनपुरे, राहता – उत्तमराव घोगरे विरोधात बाळासाहेब म्हस्के.

कोठे किती मतदार
नगर शहर 78, नगर तालुका 69, पारनेर 43, श्रीगोंदा 55, कर्जत 47, जामखेड 35, पाथर्डी 32, नेवासा 47, शेवगाव 20, राहुरी 55, श्रीरामपूर 40, राहता 42, कोपरगाव 54, संगमनेर 39, अकोले 12

Back to top button