अकोले तालुक्यात आठ "अनधिकृत पॅथॉलॉजीं लॅब"; महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे नोंदणीच नाही | पुढारी

अकोले तालुक्यात आठ "अनधिकृत पॅथॉलॉजीं लॅब"; महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे नोंदणीच नाही

अकोले पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यात “अनधिकृत पॅथॉलॉजींचा सुळसुळाट ” असे वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध होताच वृत्ताची दखल घेऊन तालुका आरोग्य यंत्रणेने अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचा शोध घेणे केले आहे. यामध्ये अकोले, देवठाण, राजूर, कोतुळ परिसरातील तब्बल ८ पॅथॉलॉजी लॅबचे महाराष्ट्र पँरामेडिकल कौन्सिलकडे रजिस्ट्रेशनचं नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा अनधिकृत पॅथॉलॉजीं लँबवर कारवाईचा बडगा केव्हा उगारणार , असा प्रश्न जनसामान्यातुन उपस्थित होत आहे.

अकोले तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात अनधिकृत पॅथॉलॉजी व लॅबरोटरीच्या माध्यमातून काही जण दिवसाढवळ्या बेकायदेशीर व्यवसाय करीत आहेत. एमबीबीएस नंतर एम. डी.(पॅथॉलॉजी) किंवा डीपीबी, डीसीपी, डीएनबी (पॅथॉलॉजी) व तत्सम पदवी प्राप्त नसेलेले अनेक बोगस लोक आपली दुकाने थाटून आहेत. नियमानुसार शासनमान्य डिएमएलटी पदवी प्राप्त पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन हाच रक्त, लघवी नमुना तपासणी करू शकतो. पण काही परवानगी नसलेले लोक स्वतःच: पॅथॉलॉजीच्या स्वाक्षरीसह रिपोर्ट देऊन पैसे उकळत गोरखधंदा करीत आहेत.

कोविड-१९ च्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची परवानगी फक्त सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्र आणि अधिकृत एमडी पॅथॉलॉजीस्ट यांनाच आहे. काही लॅब चालक अनेकदा तर तोंडीच रिपोर्ट सांगत आहेत. लेखी रिपोर्टची मागणी केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. या लॅबची अधिकृत नोंदणी नाही किंवा अधिकृत व्यक्ती त्यांच्या नोंदणी क्रमांकावर एकापेक्षा जास्त लॅब चालवत आहेत. काही लॅबचालक रिपोर्ट देताना दिशाभूल करण्यासाठी रिपोर्टच्या डाव्या कोपऱ्यात मोठ्या अधिकृत लॅबच्या नावाचाही वापर करतांना दिसतात. याबाबत दैनिक पुढारीत ” अकोले तालुक्यात ‘ अनधिकृत पॅथॉलॉजींचा सुळसुळाट ” असे वृत्त प्रसिद्ध होताच अकोले तालुका आरोग्य विभागाने पॅथॉलॉजी लँबची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत संग्रहित करुन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे.

तालुक्यात अनधिकृत पॅथॉलॉजी व लॅबरोटरीच्या माध्यमातून नागरिक चुकीचे रिपोर्ट्स किंवा अहवाल घेऊन चुकीच्या उपचाराला बळी पडत आहेत. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ८ अनधिकृत पॅथॉलॉजी लँबवर कायदेशीर कारवाई करून लॅबोरेटोरीज बंद करणे गरजेचे आहे.

अकोले शहरातील अनधिकृत पॅथॉलॉजी लँबचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकाकडे कारवाई करिता पाठविण्यात येणार असल्याचे अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक प्रकाश लोंळगे यांनी दैनिक पुढारी शी बोलताना सांगितले.

अकोले तालुक्यातील महाराष्ट्र पँरामेडिकल कौन्सिलकडे ८ पॅथॉलॉजी लॅब धारकांची नोंदणी झाली नसल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सर्वेतून समोर आली आहे. या पॅथॉलॉजी लँबची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. नोंदणी नसलेल्या लॅब धारकांचे रजिस्ट्रेशन होत नाही, तोपर्यत संबंधित लॅब बंद करण्याच्या नोटीस काढण्यात येणार आहेत.
– डॉ. शामकांत शेटे ,तालुका वैद्यकीय अधिकारी, अकोले

Back to top button