नगर : कांद्याला नाही भाव, लागवडीसाठी धावाधाव ! ज्वारीच्या आगारात कांद्याची वाढली घुसखोरी | पुढारी

नगर : कांद्याला नाही भाव, लागवडीसाठी धावाधाव ! ज्वारीच्या आगारात कांद्याची वाढली घुसखोरी

ज्ञानदेव गोरे : 

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : डोळ्यात आसू अन् गालावर हसू याची शेतकर्‍यांना प्रचिती देणार्‍या कांद्याला यंदा चांगला भाव मिळेनासा झाला आहे. कांद्याला कमी भाव, मजुरीचे वाढलेले दर अन् मजुरांच्या टंचाईने शेतकरी रडकुंडीला आला. परंतु, तरीही शेतकरी कांद्यासाठी धावाधाव करताना दिसून येत आहे. नगर तालुक्यातील दक्षिण परिसर ज्वारीचे आगार म्हणून ओळखला जातो. पाण्याची कमतरता अन् शाश्वत पाणी योजना नसल्याने पावसाच्या भरवशावर ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत होते. मात्र, गावोगावी नदी, नाल्याद्वारे वाहत जाणारे पाणी अडविल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. ज्वारीचे जिरायती क्षेत्र बागायती झाल्याने बळीराजाने ज्वारीऐवजी कांदा पीकघेण्याला प्राधान्य दिले. सध्या या परिसात कांदा लागवड जोरात सुरू आहे. वाळकी, अरणगाव, जखणगाव, गुणवडी, राळेगण, गुंडेगाव, रुईछत्तीशी, वडगाव तांदळी, दहिगाव, साकत, शिराढोण, वाळुंज, पारगाव, नारायणडोहो, सारोळा बद्दी, पारेवाडी, सारोळा कासार, अकोळनेर, सोनेवाडी, चास, मांडवा, चिचोंडी पाटील, आठवड आदी गावांमध्ये उन्हाळी कांदा लागवडीची लगबग वाढली आहे.

यावर्षी पावसाची सरासरी चांगली असल्याने भूगर्भातील पाणी पातळी समाधानकारक असून, कांदा लागवडीला शेतकर्‍यांनी पसंती दिली. सध्या मजुरांची टंचाई जाणवत असल्याने कांदा लागवड लांबणीवर गेली. लागवडीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. लागवडीसाठी एकरी 10 हजार रुपये मोजुनही मजूर मिळेनात. स्थानिक मजूर मिळत नसल्याने बाहेरील गावातून मजूर आणावे लागत असून, त्यांच्या येण्या-जाण्यासाठी लागणार्‍या वाहनाचा खर्च शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. ठेक्यावर दिलेली कांदा लागवड लवकर होत असली, तरी ठेक्यावरील मजुरांची टोळी अनेक ठिकाणी कांदा लागवडीचे कामे घेत असल्याने आपला नंबर कधी येईल, याची बळीराजाला वाट पाहावी लागत आहे.

काही ठिकाणी रोजंदारीवर कांदा लागवड सुरू आहे. दिवसामागे 500 ते 700 रुपये एका मजुरासाठी मोजावे लागतात. त्यात त्यांना येण्या-जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करावी लागत असल्याने शेतकर्‍यांचा आर्थिक खर्च वाढत आहे. बाजारात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेपोटी कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढला आहे.

कांदा लागवडीसाठी महिलांच्या टोळ्या
कांदा लागवडीसाठी गावोगावी महिला मजुरांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. एका टोळीत 10 ते 15 महिला असून, त्यांच्याकडे अनेक शेतकर्‍यांच्या कांदा लागवडी येत आहे. एकाच वेळी लागवडीसाठी अनेक शेतकरी मागणी करत असल्याने त्यांनी शेतकर्‍यांना दिवस व वेळ ठरवून दिले आहेत. अनेक शेतकरी वेटिंगवर आहेत.

यंदा मजुरी वाढली!
मागील वर्षी कांदा लागवडीसाठी एकरी आठ हजार रुपये दर होता. मात्र, यंदा मजुरीत मोठी वाढ झाली असून, त्यासाठी एकरी 10 ते 11 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यात खतांच्या किमतीही वाढल्या असल्याने कांदा लागवड खर्चिक बनली आहे.

मजुरांची होतेय बडदास्त
कांदा लागवडीसाठी बळीराजाला मजुरांची मोठी बडदास्त ठेवावी लागत आहे. कांदा लागवड लवकर होण्यासाठी मजुरांची हाजी हाजी करावी लागत आहे. मजुरांना येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था बळीराजाला करावी लागत आहे. यासाठी बळीराजाला हजार ते दोन हजार दिवसाकाठी मोजावे लागत आहे . मजूर शेतावर पायी येणाचे नावच घेत नसल्याने नाइलाजास्तव वाहन भाड्याचा भार सोसावा लागत आहे.

Back to top button