नगर : महापालिकेचे 5615 थकबाकीदार 50 हजारीपार | पुढारी

नगर : महापालिकेचे 5615 थकबाकीदार 50 हजारीपार

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या थकबाकीदारांना शास्ती माफी देऊनही त्यांनी कर भरण्याकडे नागरिकांचा कानाडोळा आहे. आता थकीत कर मालमत्ताधारकांना लोकाअदालतीमार्फत नोटिसा पाठविल्या आहेत. शहरात 50 हजारांच्या पुढील 5 हजार 615 थकबाकीदार आहेत. तर, 25 हजारांच्या पुढील 11 हजार 82 थकबाकीदार आहेत. 20 हजारांपढील 14 हजार थकबाकीदार असून, वसुली करताना मनपा कर्मचार्‍यांची दमछाक होत आहे. महापालिकेकडून, मालमत्ताधारकांकडून सर्वसाधारण कर, पथ कर, मलनिस्सरण, मलनिस्सरण लाभ कर, जललाभ कर, अवैध बांधकाम शास्ती, साफसफाई कर, घनकचरा कर, वृक्ष कर, पाणीपट्टी, शिक्षण कर, रोजगार हमी कर, मोठ्या निवासी कर यासह विविध गोष्टीसाठी मनपा मालमत्ताधारकांकडून कर वसुल करते.

मालमत्ताधारकांकडून चालू वर्षीची 50 कोटी 66 लाखांची मागणी होती. त्यात चालू वर्षीची अवघी 27 कोटी 29 लाखांची वसुली झाली. चालू वर्षीच 23 कोटी 36 लाखांची थकबाकी राहिली आहे. मालमत्ता धारकांकडे आतापर्यंत 187 कोटी 36 लाखांची थकबाकी राहिली आहे. कर सूट योजना देऊन मालमत्ताधारकांना कर भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यावर आयुक्तांनी अनेक वेळा बैठका घेऊनही उपयोग झाला नाही. थकीत मालमत्ताधारकांचे नळकनेक्शन बंद करणे, जप्तीची नोटीस बजाविणे, मोटारसायकल जप्त करणे, कर थकविणार्‍यांचे प्लेक्स प्रभागात लावणे अशा कारवाईची मोहीम राबवूनही थकबाकीदार जुमानत नाहीत. प्रत्येक प्रभाग समितीत मनपाचे पथक फिरत आहे. परंतु, वसुलीला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता थकबाकीदारांना थेट लोकअदालमध्ये हजर राहून कर भरण्यासंदर्भात संधी देण्यात आली आहे.

बड्यांकडे लाखोंची थकबाकी
महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयामध्ये बड्या लोकांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. वसुली पथक त्यांच्याकडे गेल्यानंतर नेत्याचा फोन येतो आणि पथक रिकाम्याने हाताने परत येते. त्यामुळे बड्यांची थकबाकी वाढतच चालली आहे.

 

शहरातील दहा हजारांपुढील मालमत्ता कर थकबाकीदारांना विधी व न्याय प्राधिकरणमार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे 18 फेब्रुवारीला होणार्‍या लोकअदालतमध्ये सहभागी होणार्‍या थकबाकीदारांना व्याजामध्ये 75 टक्के सूट दिली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत थकबाकीदारांनी लोकअदालतमध्ये सहभागी व्हावे.
                                   – व्ही. जी. जोशी,  प्रभारी सहायक मूल्यनिर्धारक

Back to top button