नगर : वसाहतीला अवकळा,बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी ! | पुढारी

नगर : वसाहतीला अवकळा,बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी !

गोरक्ष शेजूळ  :

नगर : शहरातील प्राईम लोकेशन असलेल्या लालटाकी येथील जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकारी वसाहतीला जणूकाही अवकळा लागल्याचे चित्र आहे. 50 वर्षापूर्वीचे बांधकाम असलेले कर्मचारी निवासस्थान धोकादायक बनल्याने ही वसाहत हळूहळू ओस पडू लागली आहे. दुसरीकडे पदाधिकार्‍यांच्या बंगल्यावरही गत सात वर्षात तब्बल सव्वादोन कोटींचा खर्च झाल्याचे बोलके आकडे ‘पुढारी’च्या हाती लागले आहेत. इतकी उधळपट्टी करूनही बंगले कागदावर ‘राहण्या योग्य नसल्याचा’ अहवाल देत पुन्हा खर्चाची तरतूद करण्याचा घाट घातला जात आहे.

जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकार्‍यांसाठी लालटाकीजवळ निवासस्थाने बांधलेली आहेत. त्यात कर्मचार्‍यांसाठी 48 निवासस्थाने आहेत. यातील डी आणि डी1- मोडकळीस आले असून दुसर्‍या वसाहतीला टाळे ठोकले आहेत. या वसाहतीत अवघे तीन-चार कुटूंबे राहत असल्याचे दिसून आले. महिला व बालकल्याण सभापतींच्या बंगल्याबाजुच्या वसाहतीमधील काही निवासस्थाने निर्लेखनपात्र आहेत, काही पाडायचे बाकी आहेत.

सात वर्षात दोन कोटी खर्च

कर्मचारी, पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या निवासस्थान दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा खर्च झाला आहे. 2019-20 मध्ये अर्थ समिती सभापतींच्या निवासस्थानाचे नवीन काम झाले. ते वगळता इतर वर्षात सरासरी 20 लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
दरवर्षीच्या खर्चातून नेमकी काय दुरुस्ती झाली या कळायला मार्ग नाही. इतका खर्च करूनही बंगले नादुरुस्त कसे?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (पूर्वार्ध)

तरीही पदाधिकार्‍यांच्या बंगल्यांची दुरवस्था !

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कृषी सभापतींचे बंगले 1968 साली बांधलेले आहेत. समाजकल्याण, महिला बालकल्याण समिती सभापतींचे बंगले 1974 ची आहेत. या सर्व बंगल्याचे दरवाजे, खिडक्या जीर्ण झााल्या असून गळती, स्वच्छतागृह नादुरुस्त असल्याचे 1 फेब्रुवारी 2021 च्या पत्रव्यवहारावरून दिसते. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडीटसाठी बांधकाम दक्षिण विभागाला शाखा अभियंताकडून 2021 मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला, पण अद्याप स्ट्रक्चरल ऑडीट झालेले नाही, उलट दरवर्षी दुरुस्तीचा खर्च सुरू राहिला. खर्च करूही ते बंगले अजूनही ‘राहण्यायोग्य’ नसल्याचेच समोर आले.

पदाधिकार्‍यांचे बंगले, कर्मचारी, अधिकारी वसाहतीवर देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला जातो. बंगल्याची गळती, स्वच्छता, वीजबील यासह अन्य बाबींवर हा खर्च होतो. दरवर्षी 20 लाखांचे बजेट असते.
                                                              – शिवाजी राऊत, शाखा अभियंता

23 कुटुंबांचे वास्तव्य ; 15 निवासस्थानांना टाळे
‘ए’ मध्ये 10, ‘बी’ 8, सी 8, डी 12, डी-1 ची 12 अशी साधारणतः 48 निवासस्थाने आहेत. त्याचे बांधकामे 1968 सालचे असल्याने तिथेे राहण्याचे धाडस करण्यास कर्मचारी धजावत नाहीत. आजमितीला 23 कर्मचारी जीव मुठीत धरून तेथे राहत आहेत, तर 15 निवासस्थानांना टाळे असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button