नगर : जेऊरमध्ये रोडरोमिओंचा उच्छाद; बंदोबस्ताची मागणी

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमीओंनी उच्छाद मांडला असून मुलींच्या छेडछाडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जय बजरंग तरुण मंडळ व राजमुद्रा ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.
जेऊर परिसरात अनेक वर्षांपासून रोडरोमीओंचा त्रास विद्यालयीन युवतींना सहन करावा लागत आहे. याबाबत येथील नामांकित विद्यालय तसेच ग्रामपंचायतच्या वतीने यापूर्वी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला निवेदन देऊन रोडरोमीओंचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गायब झालेल्या रोडरोमीओंनी पुन्हा गेल्या काही दिवसांपासून डोके वर काढले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
परिसरातील विद्यालया शेजारील चौक, ठराविक दुकाने तसेच रस्त्यावर उभे राहून अश्लील हावभाव करणे, धूम स्टाईल दुचाकी चालवत मुलींना कट मारणे, मुलींचा पाठलाग करणे, वाहनांच्या सायलन्सर मध्ये बदल करून विचित्र आवाज काढणे असे प्रकार नित्याचेच होऊन बसले आहेत. जेऊर येथे शिक्षणासाठी पांढरीपूल, डोंगरगण, आढाववाडी, धनगरवाडी, इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, वाघवाडी, तोडमलवाडी, चापेवाडी तसेच इतर वाड्या वस्त्यांवरून विद्यार्थी येत आहेत.
मुलींची छेड, पाठलाग केला तरी मुली पालकांकडून आपले शिक्षण बंद होईल या भीतीपोटी तक्रार करत नाहीत. त्यामुळे रोडरोमीओंचे फावत आहे. रोडरोमीओंची शिक्षकांना दमबाजी करण्यापर्यंत मजल गेलेली आहे. तसेच यापूर्वी अनेक वेळेस हाणामारी देखील झालेली आहे. दारूच्या नशेत तुर्र असणार्या रोडरोमीओंचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे.
वाड्या- वस्त्यांवरून येताना निर्जन ओसाड रस्ते असून अशा ठिकाणी मुलींना कट मारणे, अश्लील बोलणे हे प्रकार देखील घडत आहेत. भविष्यात येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोडरोमीओंबाबत गावातील ठराविक चौक बदनाम झालेले आहेत. त्यांचा याच परिसरात जास्त वावर आढळून येतो. जेऊर गावाबरोबरच वाड्या वस्त्यांवरून देखील टपोरी मुलांचा घोळका विद्यालयांच्या परिसरात चकरा मारत असतात. परंतु मुली अथवा पालक बदनामी नको म्हणून तक्रार करत नाही. त्याचाच फायदा रोडरोमिओ घेत आहेत. पोलिसांवर देखील तक्रार नसल्याने कारवाई करताना मर्यादा येतात. त्यामुळे पालकांनी देखील रोडरोमीओंचा बंदोबस्त होण्यासाठी तक्रार करण्याची गरज आहे..
रोडरोमीओंच्या दहशतीमुळे पालक वर्गामध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आपली कामे सोडून पालक मुलींना शाळेत ने-आण करत आहेत. तरी रोडरोमीओंचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जय बजरंग तरुण मंडळ व राजमुद्रा ग्रुप यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
जेऊर परिसरातील रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. विद्यालयाच्या वेळेत पोलिसांची नियुक्ती करण्यात येईल. आढळून येणा-या रोडरोमीओंचा बंदोबस्त करण्यात येईल. पालकांनी व मुलींनी न घाबरता समोर यावे. अथवा गुप्तपणे नावे सांगावीत.
– युवराज आठरे, स.पो.नि. एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशन.
पोलिसमित्र पथकाचा राहणार ’वॉच’
जेऊर येथील पोलिसमित्र पथकाच्या वतीने विद्यालय परिसरात ’वॉच’ ठेवण्यात येणार आहे. टपोरी मुलांची नावे पोलिसांना कळविली जातील. अशी माहिती पथकाचे सदस्य बंडू पवार, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, मायकल पाटोळे, रघुनाथ पवार यांनी दिली.