नगर : आंदोलनाला पंधरा दिवस उलटूनही कोणताही निर्णय होत नसल्याने आंदोलक आमरण उपोषण करणार | पुढारी

नगर : आंदोलनाला पंधरा दिवस उलटूनही कोणताही निर्णय होत नसल्याने आंदोलक आमरण उपोषण करणार

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शेकडो कृषी अभियंता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पंधरा दिवस उलटूनही कोणताही निर्णय होत नसल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत. 10 तारखेपासून आंदोलक आता आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याची माहिती कृषी अभियंत्यांनी दिली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून म. फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर कृशी अभियंता आंदोलकांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षा निर्णया विरोधात आंदोलन सुरू केले आहे. कृषी अभियंत्यावर अन्याय करणारा अभ्यासक्रम परिक्षेसाठी नियोजित करण्यात आला आहे. या निर्णयाने हजारो कृषी अभियंत्यांवर अन्याय होऊ नये म्हणून न्याय मागणी करणार्‍यासाठी आंदोलन सुरू आहे.

मूक मोर्चा, थाळीनाद, ढोल बजाओ, साफ स्वच्छता, विद्यापीठ प्रशासकीय इमारतीचे काम बंद पाडूनही आंदोलनाची दखल शासनाकडून घेतली गेली नाही. सर्व प्रकार पाहता विद्यार्थ्यांनी विद्यापीठातच आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन सुरू असताना सुमारे 150 पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थींनींची प्रकृती बिघडली आहे. 10 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले जाणार आहे. तसे पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले असून आंदोलक कृषी अभियंत्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार शासन असेल, असा इशारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे कृषी अभियंत्याने दिलेल्या पत्रातून व्यक्त केला आहे.

Back to top button