नगर : 1163 शेतकर्‍यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई | पुढारी

नगर : 1163 शेतकर्‍यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील 1163 शेतकर्‍यांना एकूण 718 हेक्टर क्षेत्रासाठी 1 कोटी 22 हजार रूपये अतीवृष्टी नुकसान भरपाई रक्कम टाकळीभानला मंजूर झाल्याची माहिती कामगार तलाठी कचेश्वर भडकवाल यांनी दिली आहे. टाकळीभान परीसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार येथे पंचनामे सुरु असतांनाच येथील राजकारणामुळे कामगार तलाठी अरूण हिवाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे पंचनाम्याचे काम ठप्प झाले होते.

तलाठी हिवाळे यांनी 1035 महसूल बाधित शेतकर्‍यांच्या सोयाबीन व काही बाधित क्षेत्रावरील कपाशी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले होते.  1035 शेतकर्‍यांपैकी सुमारे 779 शेतकर्‍यांची यादी प्रसिद्ध होवून 58 लाख रूपये नुकसान भरपाई रक्कम आली. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून येथील अनेक शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. येथील प्रभारी तलाठी भडकवाल यांनी वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांची यादी करून पाठविल्यानंतर 384 शेतकर्‍यांना 308 हेक्टर क्षेत्रासाठी 42 लाख 22 हजार रूपये मंजूर झालेले आहे.

पहिल्या यादीत 779 शेतकर्‍यांना 410 हेक्टर क्षेत्रासाठी 58 लाख रूपये तर दुसर्‍या यादीत 384 शेतकर्‍यांना 308 हेक्टर क्षेत्रासाठी 42 लाख 22 हजार असे एकूण 1 कोटी 22 हजार रूपये नुकसान भरपाई टाकळीभानला आली आहे.
टाकळीभान हे संपूर्ण बागायत क्षेत्र असल्याने हेक्टरी रुपये 27 हजारांप्रमाणे भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र 13 हजार 700 प्रमाणे नुकसान भरपाई मिळाली असल्याने शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकर्‍यांनी मानले तलाठ्याचे आभार
अतीवृष्टी भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केल्यावर कामगार तलाठी कचेश्वर भडकवाल यांनी तातडीने वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांची यादी करून पाठवून दिली त्यामुळे वंचित राहालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली असल्याने शेतकर्‍यांनी तलाठी भडकवाल यांना धन्यवाद दिले आहे.

Back to top button