नगर : जामखेड,नान्नजच्या मतदारांमध्ये संभ्रम ; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; गट दोन की तीन होणार ? | पुढारी

नगर : जामखेड,नान्नजच्या मतदारांमध्ये संभ्रम ; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक; गट दोन की तीन होणार ?

लियाकत शेख : 

नान्नज : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जामखेडमध्ये जिल्हा परिषदेचे दोन गट की तीन गट होणार, तसेच पंचायत समितीसाठी चार गण की, सहा गण, याविषयी तालुक्यात इच्छुक उमेदवारांसह मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. जामखेड तालुक्यात पूर्वी जामखेड, खर्डा, जवळा असे जिल्हा परिषदेचे तीन गट, तर पंचायत समितीचे अरणगाव, जवळा, जामखेड, साकत, खर्डा, सोनेगाव, असे सहा गण होते. सात-आठ वर्षापूर्वी जामखेड शहराचे नगर परिषदेत रुपांतर झाले. यामुळे तालुक्यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण रद्द झाले. तालुक्यात जिल्हा परिषदेचे खर्डा आणि जवळा, असे दोन गट, तर पंचायत समितीचे चार गण शिल्लक राहिले. मागील निवडणुकांमध्ये दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांनुसार निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या खर्डा व जवळा या दोन्ही गटावर भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर, पंचायत समितीच्या चारही गणातून भाजपच्याच उमेदवारांनी बाजी मारली.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वर्षभरापूर्वी महाविकास आघाडी सरकारने जामखेड तालुक्यात नव्याने 2011च्या लोकसंख्येप्रमाणे खर्डा, साकत, जवळा, असे तीन जिल्हा परिषदेचे गट, तर नान्नज, खर्डा, शिऊर, साकत, अरणगाव, जवळा, असे पंचायत समितीचे गण जाहीर केले होते. याबाबत तालुक्यातील नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. गट आणि गणाविषयी तालुक्यातून एकूण सहा हरकती जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल करण्यात आल्या. ही सर्व प्रक्रिया चालू असताना काही याचिकाकर्त्यांनी राज्यातील संपूर्ण निवडणूका संदर्भात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आपोआप तहकुब झाला. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होऊन शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. गेली दिड-दोन वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याचे ज्यांना डोहाळे लागले, अशांची मोठी निराशा झाली. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील बहुसंख्य जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गणाचे आरक्षण, तसेच त्यांची रचनाही बदलणार असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

कर्जत-जामखेड मतदार संघात दोन आमदार असल्याने आता जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट की, तीन गट याविषयी मोठी चर्चा सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांसह मतदारांमध्ये याविषयी मोठा संभ्रम निर्माण झाला असून, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर याविषयी तोडगा निघणार आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून नान्नजचा एक लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समितीचा सदस्य झाला नाही. यामुळे नान्नजसह परिसराचा विकास रखडला असून, येथील दहा हजार मतदार केवळ मतदारच राहिले आहे.‘नान्नजचा एकही सदस्य नसल्याने विकास खुंटला’ सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर याविषयी तोडगा निघणार असल्याचे चिन्ह आता दिसू लागले असून, गेल्या 25 ते 30 वर्षांपासून नान्नजचा एकही नेता जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य झालेला नाही. यामुळे या भागाचा विकास रखडला असून, नान्नजसह परिसरातील वाड्या वस्त्यांवरील दहा हजार मतदार केवळ मतदारच राहिले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या  निकालानंतर चित्र स्पष्ट
जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट की, तीन गट याविषयी तालुक्यात संभ्रम आहे. राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा विषय हा सुप्रीम कोर्टात असल्याने या निकालानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे आमदार राम शिंदे यांनी ‘पुढारी’ला सांगितले.

Back to top button