नगर : जिल्ह्यातील 98 हजार मतदारांची छायाचित्रे खराब ; कर्जतमध्ये सर्वाधिक संख्या | पुढारी

नगर : जिल्ह्यातील 98 हजार मतदारांची छायाचित्रे खराब ; कर्जतमध्ये सर्वाधिक संख्या

नगर : पुढारी वृत्तसेवा : मतदान ओळखपत्रावरील खराब छायाचित्रामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खराब छायाचित्र बदलण्याची मोहीम निवडणूक आयोगाने हाती घेतली. जिल्ह्यात 98 हजार 413 मतदारांच्या मतदान ओळखपत्रांवरील छायाचित्र खराब आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक कर्जत- जामखेड मतदारसंघातील 26 हजार 599 मतदारांचा समावेश आहे. या मतदारांचा शोध घेऊन त्यांचे छायाचित्र बदलण्यात येणार आहे. जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या आता 35 लाख 54 हजार एवढी आहे. जवळपास सर्वच मतदारांच्या मतदार ओळखपत्रास छायाचित्र आहे.

मतदार यादीत मतदारांचे रंगीत छायाचित्र वापरले जाते. मात्र, मतदानासाठी कृष्णधवल छायाचित्र असलेल्या मतदार यादीचा वापर केला जात आहे. त्यातून मतदारांचा चेहरा स्पष्टपणे ओळखणे शक्य आहे. मतदारयादीतील सर्वच मतदारांचे छायाचित्र चांगले येतील, यासाठी आयोगाकडून दक्षता घेतली जात आहे. आयोगाची मतदारयादी ज्या संगणक प्रणालीवर (सॉफ्टवेअर) तयार केली जाते. त्या प्रणालीव्दारे मतदान ओळखपत्रावरील पुसट व खराब छायाचित्रांची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 98 हजार 413 मतदारांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. कर्जत -जामखेड मतदारसंघातील सर्वाधिक 26 हजार 599 मतदारांचे छायाचित्र खराब आहे.

या मतदारांचे छायाचित्र बदलण्याचे काम जिल्हा निवडणूक यंत्रणेने हाती घेतले. यासाठी तहसील कार्यालयांना आकडेवारी पाठविण्यात येणार असून, गावागावांतील बीएलओंच्या माध्यमातून मतदार ओळखपत्रावरील छायाचित्र खराब असलेल्या मतदारांना शोधून त्यांच्याकडून नवीन छायाचित्र घेऊन रितसर मतदार यादीत दुरुस्ती केली जाणार आहे. संबंधित मतदारांना बीएलओंना नवीन छायाचित्र देऊन सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.

  • खराब मतदार ओळखपत्रांची संख्या
    कर्जत-जामखेड 26599, अकोले 5503, संगमनेर 3572, शिर्डी 2444, कोपरगाव 3074, श्रीरामपूर 4986, नेवासा 5123, शेवगाव 11973, राहुरी 5019, पारनेर 9572, अहमदनगर शहर 3385, श्रीगोंदा 17163.

Back to top button