नगर : चिंचाळे फाटा यात्रेत बैलगाडा शर्यत, चौघांविरुद्ध गुन्हा

नगर : चिंचाळे फाटा यात्रेत बैलगाडा शर्यत, चौघांविरुद्ध गुन्हा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हाधिकार्‍यांची परवानगी नसताना राहुरी तालुक्यातील चिंचाळे फाटा येथे बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरविणार्‍या चौघांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ताहाराबाद रोडलगत चिंचाळे फाटा येथे सोमवारी बिरोबा देवस्थानची यात्रा होती. यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी यांची कुठलीही परवानगी नसताना बैलगाडा शर्यत भरविल्याची माहिती पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस यात्रेस्थळी दाखल झाले. 40 – 50 बैलगाडा धावकांच्या मदतीने घोडे- बैलगाडा हार-जीतची शर्यत लावून गाड्यांना जुंपलेल्या घोडे, बैलांना अधिक वेगाने पळावे याकरिता बैलगाडा धारकांनी हातातील चाबकाने पाठीवर, पायावर मारले. बैलांच्या शेपटी पीरघळून त्यांना अधिक वेगाने पाळण्याकरिता क्रूरपणे वागवून शर्यत जिंकून स्वतःसह तेथील लोकांच्या मनोरंजनाकरिता शर्यत घेताना चौघेजन पोलिसांना मिळून आले. दरम्यान, याबाबत पोलिस हे.काँ. जानकीराम खेमनर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात सोन्याबापू चिमाजी कोळसे, बापूसाहेब राणोजी गडदे, योगेश सोपान गडदे , संदीप भागवत बाचकर (सर्व रा. गडदे आखाडा, ता.राहुरी, जि. अ. नगर) या चौघांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 188, प्राण्यांना निर्दयतेने वागविणेस प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पो. ना. रामनाथ सानप करीत असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईने यात्रेकरुंमध्ये खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news