शिर्डी : बाजीप्रभू म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले ! ; ना. विखे यांची आ. थोरातांवर घणाघाती टीका | पुढारी

शिर्डी : बाजीप्रभू म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले ! ; ना. विखे यांची आ. थोरातांवर घणाघाती टीका

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  2019 साली ‘काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार,’ असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणार म्हणत मिरवून घेणारे आता हतबल का झाले, खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, असे उपरोधिक घणाघाती टीकास्त्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी आ. बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेवर सोडले. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर ना. विखे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविण्याची भाषा करतात. त्यांचे प्रदेशाध्यक्षांशी जमत नाही म्हणून सांगतात. या बर्‍याच गोष्टींचे आश्चर्य वाटते. नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, पण काँग्रेसने महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही, हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे, असे ना. विखे म्हणाले.

काँग्रेसमध्ये देखील तुम्हाला कुणी विचारत नाही. तुम्ही देशातील अध्यक्षांकडे जाऊन भांडा किंवा महाराष्ट्राचे प्रभारी असतील त्यांच्याकडे जाऊन भांडा, परंतु पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झाला आहे, त्याची जबाबदारी ते घेणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असा प्रश्न ना. विखे पा. यांनी उपस्थित केला.

Back to top button