नगर : आधुनिक युगात, वर्हाडी बैलगाडीत ! चक्क टाळ मृदुंगाच्या गजरात वरात आली मंडपात

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवे येथे नुकत्याच पार पडलेला एका विवाह सोहळा चांगलाच कुतूहलाचा विषय ठरला. जुन्या रूढी-परंपरांना उजाळा देत, चक्क वीस बैलगाड्यांतून आलेली वर्हाडी मंडळी, डीजे किंवा बँड न लावता चक्क टाळ मृदुंगाच्या गजरात नवरदेवाचे मंडपात झालेले आगमन, यामुळे हा सोहळा आगळावेगळा ठरला. दत्ताचे शिंगवे येथील गंगाधर महाराज गाडेकर यांची कन्या पल्लवी व प्रल्हाद भवार यांचे चिरंजीव देवेंद्र यांचा लग्न सोहळा मंगळवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित संत मंडळींसह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान देखील ग्रंथ भेट देऊन करण्यात आला.
नवरदेव देवेंद्र याने हातामध्ये वीणा, डोक्यावर पगडी घालत संत तुकाराम महाराजांसारखा वेश परिधान केलेला होता. तर, वधू पल्लवी हिने राजमाता जिजाऊप्रमाणे वस्त्र परिधान केले होते. डीजेचा दणदणाट, फटाक्यांंची आतषबाजी, तरुणाईकडून होणारा धांगडधिंगाणा, या सर्व गोष्टींना पूर्णपणे फाटा देत हरिनामाचा गजर करत महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी सांप्रदायाची शिकवण, या दोन्हींचा मिलाफ या ठिकाणी दिसून आला.
बैलगाडीतून आलेल्या वर्हाडी मंडळीला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाहण्याचा योग उपस्थित सर्वच मंडळींना आल. त्यामुळे अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, उद्धव महाराज सबलस, वच्छलाताई साबळे, साध्वी निर्मलाताई पुरी, वासुदेव महाराज गाडेकर, शंकर महाराज ससे, दीपक महाराज काळे, माजी जि. प. सदस्या उषाताई कराळे, संतोष शिंदे, वैभव खलाटे, मिठू मुळे, संजय नवल, भागिनाथ गवळी, नामदेव दारकुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
संस्कृतीला धरूनच लग्नसोहळे व्हावेत
वधू-वरांना आशीर्वाद देताना आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, संस्कृतीला धरूनच लग्न सोहळे पार पडले पाहिजेत. संस्कृती आणि संत संगती यांचा अनोखा संगम या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दिसून आला.
धर्म आणि संस्कृती विसरू नका
उद्धव महाराज सबलस म्हणाले, माणूस चंद्रापर्यंत पोहोचला असला तरी धर्म आणि संस्कृतीला कोणीही विसरता कामा नये. लग्न सोहळ्यात मोठा खर्च केला याला महत्त्व नसून, तो धर्म आणि संस्कृतीला धरून पार पडला का, याला खरे महत्त्व आहे.