नगर : बोधेगावच्या व्यावसायिकाची फसवणूक | पुढारी

नगर : बोधेगावच्या व्यावसायिकाची फसवणूक

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा :  स्टेट बँकेचे बंद पडलेले क्रेडिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने फोन करून भामट्याने व्यावसायिकाच्या बँक खात्याचे डिटेल घेतले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 35 हजार 240 रूपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी अनोेळखी इसमाविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोधेगाव येथील ज्ञानेश्वर नारायण थोरात यांची मोबाईल शॉपी आहे. ते दुकानात मोबाईल दुरुस्ती करीत असताना, 25 जानेवारी रोजी सकाळी 11.20 च्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यावर भामट्याने स्टेट बँकेतून बोलत असून, तुमचे बंद पडलेले क्रेडिट कार्ड चालू करून देतो, असे सांगून थोरात यांच्या बँक खात्याची सर्व माहिती विचारून घेतली. त्यानंतर थोरात यांच्या खात्यातून 29 हजार 999 रूपये कट झाले.

याबाबत थोरात यांनी विचारणा केल्यावर तुमच्या खात्यावर पैसे परत येतील, असे त्याने सांगितले. त्यानुसार कट झालेले पैसे तासाभराने पुन्हा थोरात यांच्या खात्यात जमा झाले. पुन्हा खात्यावर पैसे टाकून या भामट्याने थोरात यांचा विश्वास संपादन केला.  त्यानंतर त्याने स्टेट बँक आणि एचडीएफसी बँकेचे सर्व डिटेल्स विचारून घेतले. नंतर 25 ते 31 जानेवारी दरम्यान थोरात यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून 57 हजार रूपये, तर एचडीएफसी बँकेच्या खात्यातून 78 हजार 240 रूपये सदर भामट्याने काढून घेतले.

बँक खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज 31 जानेवारीला संध्याकाळी आल्यानंतर थोरात यांनी 1 फेब्रुवारीला स्टेट बँकेच्या शेवगाव शाखेत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा आमच्या बँकेकडून असा कोणताही फोन केला नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनतर अज्ञात भामट्याने फसवणूक केल्याचे थोरात यांच्या लक्षात आले. त्यांनी शेवगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बागुल हे करीत आहेत.

Back to top button