गणोरे : विजेच्या पोलवरून पडून वायरमन जागीच ठार | पुढारी

गणोरे : विजेच्या पोलवरून पडून वायरमन जागीच ठार

गणोरे; पुढारी वृत्तसेवा : विजेचा धक्का लागून खांबावरून कोसळून वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना विरगाव (ता. अकोले) येथे घडली. भाऊसाहेब रामनाथ आंबरे (वय 53 वर्षे) असे मृताचे नाव आहे. भाऊसाहेब आंबरे गणोरे येथे गेले अनेक दिवसांपासून वायरमनसोबत बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून काम करीत होते.

गणोरे परिसरात गेल्या पाच- सहा दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. विरगाव सब स्टेशनवरुन परमीट घेऊन सबस्टेशनच्या नजीक असलेल्या विजेच्या पोलवर जम्प टाकण्याचे काम करताना अचानक विजेचा धक्का लागून खाली पडल्याने आंबरे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. जमिनीवरील दगड आंबरे यांच्या डोक्यात घुसल्याने खोलवर जखम झाली.

दगडाचा डोक्याला जोराचा मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. सोबत असलेले लाईनमन नबाजी बोरुड व ग्रामस्थांच्या सहकार्याने अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपचारास कोणताही प्रतिसाद न दिल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाऊसाहेब आंबरे यांचे निधन झाल्याने गणोरे गावावर शोककळा पसलली आहे. गणोरेतील व्यापार्‍यांनी सोमवारी दु.12 वाजेपर्यत व्यवसाय बंद ठेवले. आंबरे यांच्या पश्चात पत्नी,आई, मुलगा, दोन मुली, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

Back to top button