शासन आपल्या दारी’ येणार, महसूल विभाग गावातच दाखले देणार | पुढारी

शासन आपल्या दारी’ येणार, महसूल विभाग गावातच दाखले देणार

लोणी; पुढारी वृत्तसेवा : शासकीय कार्यालयांमधून आवश्यक असलेल्या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरिकांना सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावेत म्हणून सर्व तालुक्यांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून जनतेच्या समस्याही जाणून घेण्याच्या सूचना महसूल विभागातील अधिकार्‍यांना दिल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली.

महसूल विभागातून आवश्यक असलेले दाखले मिळण्यास बहुतांश वेळा विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागपत्रांमध्ये त्रृटी असतात. त्यामुळे सामान्य माणसाला योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांकरीताही विद्यार्थ्यांना निर्माण होणार्‍या अडचणी प्रवेशापूर्वी दूर व्हाव्या, शिधा पत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र नागरिकांना सहज उपलब्ध व्हावे, हा यामागील उद्देश असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयाच्या वतीने गावपातळीवर ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे नियोजन करावे. त्या- त्या गावांमध्ये या उपक्रमाचे कॅम्प लागण्यापूर्वी नागरिकांना माहिती कळवावी, महसूलच्या सर्व योजनांचे स्वतंत्र विभाग करून, नागरिकांचे अर्ज दाखल करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या, अशा सुचना अधिकार्‍यांना दिल्याचे स्पष्ट करुन, या महिन्यातच सर्व ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रमाचे नियोजन करुन, पुढील 15 दिवसांत सर्व दाखले नागरीकांना कसे मिळतील, याचे प्रयत्न अधिकार्‍यांनी करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. तालुकास्तरावर उपक्रमात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभाग घेणार असल्याचे ते म्हणाले.

Back to top button