पारनेर : ग्रामसेवकाकडून 5 लाखांचा अपहार; गुन्हा दाखल | पुढारी

पारनेर : ग्रामसेवकाकडून 5 लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चोंभुत ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक स्वप्नील आंबेटकर यांच्यावर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी आलेल्या निधीतून पाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कैलास मधुकर जगताप यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. चोंभुत गावठाण वस्तीत करण्यात आलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा दोन टक्के जीएसटी आरटीजीएस या नावाने शासन खात्यात भरणा करणे आवश्यक होते.

मात्र, ग्रामसेवक आंबेटकर यांनी दि. 4 जानेवारी 2022 रोजी ही रक्कम जीएसटी खाती वर्ग न करता, या रकमेच्या पुढे पाच लाख रुपये अक्षरी व अंकी नमूद करून त्रयस्थ खातेदार प्रवीण मुळे यांच्या खात्यावर वर्ग करून शासकीय रकमेचा वापर केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ग्रामसेवक आंबेटकर यांनी सदर शासकीय खात्यामधून 5 लाख 8 हजार 911 रूपयांचा अपहार केल्याचा लेखी अहवाल गटविकास अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर केला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ग्रामसेवक आंबेटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी कळविले होते. त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

कारभारची चौकशी करा
निलंबित ग्रामसेवक स्वप्नील आंबेटकर यांनी यापूर्वी चिंचोली पठारवाडी येथे देखील ग्रामसेवक म्हणून काम केले आहे. त्या ठिकाणच्या कारभारामध्येही पारदर्शकता नसल्याने तेथील त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.

बदलीनंतर प्रकार उघडकीस
ग्रामसेवक आंबेटकर यांची चोंभुत ग्रामपंचायतीतून अकोले पंचायत समितीत बदली झाली. त्यांच्या जागेवर सारिका वसंत म्हेत्रे बदलून आल्या. त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तो गटविकास अधिकार्‍यांना कळविला. त्यानंतर हा अपहार समोर आला. सध्या आंबेटकर हे निलंबित असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

Back to top button