नगर : निर्लेखन होऊनही इमारत पाडण्यास टाळाटाळ | पुढारी

नगर : निर्लेखन होऊनही इमारत पाडण्यास टाळाटाळ

नगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या सात महिन्यांपूर्वी धोकादायक बनलेल्या कर्मचार्‍यांच्या दोन निवासस्थानांचे निर्लेखन होऊन ते पाडण्याच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी सूचना केल्या, मात्र अजुनही ही इमारत पाडण्यासाठी बांधकाम शाखा अभियंत्यांना मुहूर्त सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज याच इमारतीत विषारी साप, मुंगसे, भटके कुत्रे खेळत असल्याने घबराट पसरली आहे.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत लालटाकीजवळ शासकीय निवासस्थानात वसाहती आहेत. यातील ए-टाईप मधील नंबर 1 व 2 मधील इमारत ही जुनी व धोकादायक बनली होती. या इमारतीचे निर्लेखन करावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यानुसार जिल्हा परिषदेतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

संबंधित बांधकाम 54 वर्षापूर्वीचे आहे. ती इमारत मोडकळीस आली असल्याने निर्लेखनात ती पाडण्यायोग्य असल्याचे पुढे आले. त्यासाठी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहमतीप्रमाणे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी ही इमारत पाडण्याची मान्यता दिली होती. 20 मे 2022 रोजी ही इमारत पाडण्याचे संबंधित आदेश शाखा अभियंता यांना देण्यात आले होते.

मात्र लांगोरे यांनी हे आदेश देवून तब्बल सात महिने उलटली, तरीही अद्याप ही इमारत पाडण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे आज या इमारतीत विषारी साप, मुंगसे, भटके कुत्रे खेळताना दिसत आहे. या परिसरात कर्मचारी निवास करत आहेत. त्यांची लहान मुले या ठिकाणी आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून कर्मचारी राहत असल्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.

कोटः लालटाकीजवळील कर्मचारी निवासस्थानाचे निर्लेखन झालेले आहे. ते पाडण्याचे आदेशही आहेत. मात्र पंचायत समितीचे गोडावून आणि संबंधित इमारती एकाचवेळी निविदा काढून पाडल्या जाणार आहेत. लवकरच हे काम मार्गी लागेल.

शिवाजी राऊत, शाखा अभियंता

Back to top button