कर्जत : केंद्राने साखर निर्यातीला परवानगी द्यावी : अजित पवार

कर्जत/सिद्धटेक; पुढारी वृत्तसेवा : ऊस उत्पादक शेतकर्यांना ज्यादा दर मिळावा म्हणून केंद्र सरकारने शेजारील देशांना साखर निर्यात करण्याच्या धोरणाला परवानगी द्यावी. शेतकर्यांना जास्त दर देता येईल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. अंबालिका शुगर (ता. कर्जत) येथे ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
पवार म्हणाले, शेतकर्यांसाठी साखर कारखाना विविध उपक्रम राबवत आहेत. यामध्ये माती परीक्षण, ठिबक सिंचन, ऊस बेणे मळा याचा फायदा शेतकर्यांनी घ्यावा. साखर कारखाने दिवसेन दिवस आपली गाळप क्षमता वाढवत आहेत. त्यामुळे काही दिवसात कारखाने शेतकर्यांच्या दारात येतील. त्यासाठी शेतकर्यांनी एकरी गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढवले पाहिजे.
या कार्यक्रमामध्ये एकरी शंभर टन उत्पादन कसे काढावे या विषयावर शेतीतज्ज्ञ सुरेश कबाडे यांनी मार्गदर्शन केले. व्हीएसआयचे शास्त्रज्ञ पी. पी. शिंदे व एस. एस. कटके यांनी उस लागवड तंत्रज्ञान, ऊस बेणे व खोडवा व्यवस्थापन यावरती मार्गदर्शन केले. तसेच, जैन इरीगेशनचे अभय जैन यांनी ठिबक सिंचनामधील नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्यांना दिली. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दौंड शुगरचे वीरधवल जगदाळे, तालुकाध्यक्ष काका तापकीर, राजेंद्र गुंड, नितीन धांडे, मुख्य संचलन अधिकारी जंगल वाघ, संचालक विश्वजित भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे, श्याम कानगुडे, शहाजीराजे भोसले आदी उपस्थित होते.