नगर : अतिवृष्टीची मदत ऑनलाईन जमा होणार | पुढारी

नगर : अतिवृष्टीची मदत ऑनलाईन जमा होणार

नगर; पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे 2 लाख 54 हजार 691 शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले. या बाधित शेतकर्‍यांना मदतीचा निधी जुन्या कार्यपद्धतीनुसार वितरित न करता आता ऑनलाईन वितरित होणार आहे. त्यासाठी महा आयटी याची संगणक प्रणाली विकसीत केली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -2019 अंर्गतगत पात्र लाभार्थ्यांना ज्या पध्दतीने प्रोत्साहनपर लाभ मिळतो. त्याच धर्तीवर बाधित शेतकर्‍यांना 291 कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकर्‍यांचा डाटा तयार केला. शासनाने मागणी करताच डाटा पाठविला जाणार आहे. या नवीन निर्णयामुळे नुकसान भरपाई लांबणीवर पडली आहे. खरीप हंगामातील पिके जोमात असताना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या 1 लाख 55 हजार हेक्टर 355 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. शासनाने नुकसानभरपाई दुपट दराने देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यासाठी 291 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

निधी मंजूर होऊन महिना उलटला. मध्यंतरी पदवीधर निवडणुकीची धामधूम सुरु होती. त्यामुळे निधी उपलब्ध झाला नाही. निवडणूक संपल्यानंतर निधी उपलब्ध होईल, असे वाटत असतानाच आता नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्य अंतर्गत निधी वितरणाची जुन्या कार्यपध्दतीत शासनाने 24 जानेवारी रोजी बदल केला.

यापूर्वी शासनाने निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (बीडीएस) विभागीय आयुक्त यांना वितरीत केला जात होता. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तो निधी जिल्हाधिकारी यांना वितरीत होत असे. त्यानंतर हाच निधी तहसीलदार यांना वितरीत केला जात होता. तहसीलदार शेतकर्‍यांच्या बँक खात्यात निधी वर्ग करीत होते. आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -2019 अंर्गतगत पात्र लाभार्थ्यांना ज्या पध्दतीने प्रोत्साहनपर लाभ मिळतो. त्याच धर्तीवर बाधित शेतकर्‍यांना ऑनलाईन 291 कोटींची नुकसानभरपाई मिळणार आहे.

बाधित शेतकर्‍यांची आर्थिक तारांबळ
अतिवृष्टी होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला. महिनाभरापूर्वी शासनाने अनुदान मंजूर केले. मात्र, अद्याप अडीच लाख शेतकर्‍यांना नुकसानभरपाई अदा झाली नाही. काढणीला आलेले पिके वाया गेल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे बाधित शेतकर्‍यांची आर्थिक तारांबळ सुरु आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई अदा करावी, अशी मागणी बाधित शेतकर्‍यांकडून होत आहे.

Back to top button